साहेब, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 04:22 PM2024-06-26T16:22:36+5:302024-06-26T16:24:45+5:30

Amravati : तहसील कार्यालयात नागरिकांना दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव

Sir, are our lives worth nothing? | साहेब, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का?

Are our lives worth nothing?

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा :
तालुक्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेल्या कार्यालयात शासकीय दाखले, मालमत्तेची खरेदी-विक्री, शालेय दाखले, शेतशिवाराच्या भानगडी अशा एक ना अनेक कामकाजासाठी शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येरझारा घालतात. परंतु, येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथील वॉटर कूलरमधून जंतुजन्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

या जंतुसंसर्गित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याची तहसील प्रशासनाला पुसटशीही कल्पना नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाची ही अनभिज्ञता सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.


शासकीय कामकाजानिमित्त येणाऱ्या गोरगरीब आबालवृद्धांना पिण्यासाठी येथे वॉटर कूलर लावण्यात आले आहे. परंतु, ज्या टाकीतून वॉटर कूलरला पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, त्या पाण्याच्या टाक्या झाकणविरहित असून, त्यामध्ये तुडुंब जलचर वनस्पती तथा जीवजंतू साचले आहे. तहसील कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित झाले तेव्हापासून त्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली नसून, याबाबत तहसील प्रशासनाने कधी गांभीर्यच दाखविले नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भऊ शकते.


स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था 
तहसील कार्यालयात असलेल्या स्वच्छतागृहांपैकी अर्धेअधिक कुलूपबंद आहेत, तर वापरातील स्वच्छतागृहांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याची दुर्गंधी तहसील कार्यालयाच्या आवारात पसरते.


अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र वॉटर कॅन
विशेष म्हणजे, येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी कधीच वॉटर कूलरचे पाणी पित नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक दालनात शुद्ध वॉटर कॅनची सोय आहे.


'लोकमत'ने शोधले वास्तव
तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिक पीत असलेले पाणी दूषित व जंतुजन्य असल्याचा संशय येताच लोकमतने पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तेव्हा शेवाळयुक्त व घाण साचलेल्या पाण्याच्या उघड्या टाक्या निदर्शनास आल्या.


पावसाळ्यात धोका
पावसाळ्यात पाण्यात जंतुजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्वच्छ व उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मेंटेनन्स निधी जातो कुठे?
स्थानिक कार्यालयातील नियमित नियोजनासाठी तहसील कार्यालयाला निधी प्राप्त होतो. हा निधी नेमका कुठे खर्च होतो, अशी विचारणा टाक्यांच्या स्थितीवरून केली जात आहे.

Web Title: Sir, are our lives worth nothing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.