सैराट झालं जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 11:56 PM2018-05-08T23:56:43+5:302018-05-08T23:57:36+5:30
वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात येणारे पोलीस असो की नागरीक, प्रत्येकाच्या तोंडी 'सैराट आहे का?' हा प्रश्न येतो.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात येणारे पोलीस असो की नागरीक, प्रत्येकाच्या तोंडी 'सैराट आहे का?' हा प्रश्न येतो. संबंधित पोलीससुद्धा 'सैराट झालं जी...’ असे सूचक उत्तर स्मितहास्यासह दिल्याशिवाय राहत नाहीत.
‘सैराट’ या गाजलेल्या चित्रपटाने तरुणाईसोबतच अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आगळीवेगळी छबी तयार केली आहे. या चित्रपटानंतर कोठेही प्रेमीयुगुल दिसले की, 'सैराट आहेत ते' अशी प्रतिक्रिया हमखास ऐकायला मिळते. प्रेम आंधळ असतं, प्रेमासाठी वाटेल ते करायला आजची युवा पिढी तयारच असते, लपूनछपून प्रेम करण्याचा काही आगळावेगळाच अनुभव असतो. सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करण्यास मुभा नाही. त्यामुळे बरेचसे प्रेमीयुगुल एकमेकांच्या सान्निध्यात काही क्षण राहण्यासाठी जागा शोधतात. ती जागा जर निसर्गरम्य असेल, तर अशा वातावरणात प्रेमालाप करण्याची संधी प्रेमीयुगुलांना मिळते. त्यामुळे प्रेमीयुगुलांचा सर्वाधिक वावर असणारा परिसर फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीत वडाळीतील बांबू गार्डन, मालटेकडी, सुपर एक्स्प्रेस हायवेकडील निवांत रस्ते व परिसर आहे. याच ठाण्याच्या हद्दीत प्रेमीयुगुलांना सैरसपाटा सर्वाधिक आहे. मागील चार महिन्यातील आकडेवारीवर लक्ष दिल्यास, नववर्षात ८ मेपर्यंत तब्बल २५९ प्रेमीयुगुलांना फ्रेजरपुरा पोलिसांनी पोलिसांनी पकडून ठाण्यात आणले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रेमीयुगुल हे बांबू गार्डनमधून पकडण्यात आले.
शहरात महिला सुरक्षेच्या दृष्टीने तयार केलेल्या चिडीमार पथक व दामिनी पथकाने या प्रेमीयुगुलांना पकडले आहे. या प्रेमीयुगुलांना ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या पालकांना किंवा परिचित व्यक्तींना बोलावून त्यांना कल्पना दिली जाते तसेच त्या प्रेमीयुगुलांना सक्त ताकीद देऊन पुन्हा असे न करण्याची समज देण्यात येते. निवांत ठिकाणी बसणाऱ्या प्रेमीयुगुलांवर संकट येऊ शकते, हे पोलिसांकडून स्पष्ट केले जाते. या प्रेमीयुगुलांचे पालक किंवा परिचीत जोपर्यंत ठाण्यात येत नाही, तोपर्यंत त्यांना ठाण्यातच बसून ठेवले जाते. त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी इत्थंभूत माहिती पोलीस घेतात आणि त्यांच्यावर सीआरपीसी कलम ११० व ११७ प्रमाणे कारवाई केली जाते. फ्रेजरपुरा ठाण्यात दररोज प्रेमीयुगुलांचा राबता असल्यामुळे ‘सैराट झालं जी...’ हा परवलीचा शब्द झाला आहे.
अशी कारवाई योग्य आहे का?
प्रेमीयुगुल प्रेमालापासाठी बांबू गार्डनमध्ये जातात. निसर्गरम्य वातावरण बघून गप्पांना सुरुवात होते तोच पोलीस कारवाईसाठी हजर होतात. मग प्रेमीयुगुलाने जावे तरी कुठे, असा प्रश्न तरुणाईला पडला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात बसणारी ही तरुणाई पोलिसांच्या अशा कारभाराला त्रस्त झालेली आहे. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई योग्य आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.