लहान भावाची हत्या करणाऱ्या ‘त्या’ बहिणीला १३ पर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 07:27 PM2020-07-11T19:27:30+5:302020-07-11T19:27:51+5:30
१० वर्षीय अल्पवयीन भावाचा बत्त्याने ठेचून खून करणाºया ऐश्वर्या (बदललेले नाव) न्यायालयाने शनिवारी १३ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती खोलापुरीगेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी लोकमतला दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : १० वर्षीय अल्पवयीन भावाचा बत्त्याने ठेचून खून करणाऱ्या ऐश्वर्या (बदललेले नाव) न्यायालयाने शनिवारी १३ जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती खोलापुरीगेट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांनी लोकमतला दिली.
भावाला कायमचे संपविल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे तिथेच सोडून दुसरे कपडे परिधान करून ऐश्वर्या घरातून निघून गेली. दिवसभर सैरभैर फिरल्यानंतर रात्री ती अकोली गावाजवळील एका मंदिराजवळ बसली. माझे घरी भांडण झाले आहे. मला रात्रभर थांबू द्या, असे एका दामपत्याला सांगून नजीकच्या एका फ्लॅटमध्ये तिने गुरुवारी रात्री आश्रय घेतला. या मुलीने लहानग्या भावाचा खून केला, याची त्या दाम्पत्याला कल्पना नव्हती. शुक्रवारी सकाळीच ती मुलगी तेथून निघून गेली.
सकाळी ११.३० वाजता पोलिसांनी सराफा बाजारातून तिला अटक केली. ज्यांच्याकडे ती रात्रभर थांबली होती, त्या ठिकाणी पोलिसांनी ऐश्वर्याला शुक्रवारी रात्री चौकशीकरिता नेले होते. त्या पती-पत्नीचे बयाण पोलिसांनी नोंदविल्याची माहितीसुद्धा ठाणेदार घारपांडे यांनी दिली. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीदरम्यान संतोष (बदललेले नाव) याच्या खून प्रकरणातील आणखी सत्य बाहेर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अकोली गावाजवळील ज्या फ्लॅटमध्ये सदर मुलगी रात्रभर थांबली होती, त्या फ्लटमधील रहिवासी पती-पत्नीचे बयाण नोंदविले आहे. न्यायालयाने आरोपी मुलीला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अतुल घारपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोलापुरीगेट
काय आहे ही घटना?
घराबाहेर जाऊ देत नाही या कारणासाठी मोठ्या बहिणीने लहान भावावर बत्त्याचे अनेक वार करून त्याला ठार केल्याची घटना खोलापुरी गेट येथे घडली होती. आपले आईवडील आपल्यापेक्षा लहान भावावरच जास्त प्रेम करतात असे तिला नेहमी वाटत असायचे. तसे ती बोलूनही दाखवत असे व त्याविरुद्ध रोषही व्यक्त करत असे. मात्र तिच्या या बोलण्याकडे आईवडिलांनी फार गंभीरतेने विचार केला नाही.
तिच्या या रागापायी तिने याआधीही घर सोडून जाण्याचे दोनदा प्रयत्न केले होते. आठच दिवसांआधी तिला पोलिसांनी घरी आणून सोडले होते. त्यामुळे त्यावर कायमची देखरेख ठेवली जात होती.
गुरुवारी तिचे आईवडिल दोघेही घरी नसताना तिने पुन्हा घर सोडण्याचा निर्धार केला व बॅग भरायला घेतली. ते पाहून लहानशा भावाला पुढील कल्पना आली. त्याने ताई, तू जाऊ नको ना.. अशी प्रेमळ व आर्त विनवणी सुरु केली. त्याला न जुमानता ती घरातून निघू लागली. त्यावेळी लहानग्या भावाने असहाय्यपणे मदतीसाठी शेजाऱ्यांना आवाज दिला.. त्याने आरडाओरडा सुरू करताच संतापलेल्या बहिणीने जवळच पडलेला बत्ता उचलून त्याच्या डोक्यावर प्रहार करणे सुरू केले. बत्त्याच्या माराने त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले व तो खाली कोसळला. रक्ताने माखलेले कपड्यांनिशी तिने घरातून पळ काढला.