जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचा कक्षात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:17 AM2021-08-14T04:17:23+5:302021-08-14T04:17:23+5:30
थकीत वेतनासाठी आक्रमक, सीईओंच्या आश्वासनानंतर तिढा सुटला अमरावती : जिल्हा पशुसंवर्धन विभागा अंतर्गत कार्यरत पशुधन पर्यवेक्षक आणी सहायक पशुधन ...
थकीत वेतनासाठी आक्रमक, सीईओंच्या आश्वासनानंतर तिढा सुटला
अमरावती : जिल्हा पशुसंवर्धन विभागा अंतर्गत कार्यरत पशुधन पर्यवेक्षक आणी सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १ पासून वेतनासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांचे दालनात ठिय्या आंदोलन केले.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या पशुधन पर्यवेक्षक आणी सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी गत १५ जूनपासून असहकार आंदोलन पुकारले होते. आंदोलन केले असले तरी नियमाप्रमाणे आपले कर्तव्यसुद्धा बजावले आहे. या आंदोलनादरम्यान जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले होते. या आंदोलनकर्त्यांसोबतच आपल्या कर्तव्यावर हजर असतानाही परिचर वर्गाचे वेतन थांबवण्यात आले होते. वेतन रोखल्यामुळे या कर्मचाऱ्यांचेवर असलेले घराचे हफ्ते थांबले परिणामी व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही भरपाई कोण देणार, असा सवाल उपस्थित करीत वेतन अदा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, आंदोलकांनी सीईओ अविश्यांत पंडा यांचे सोबत संवाद साधला यावर वेतन अदा करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले , यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम किरकटे, सदाशिव सातव, राजेंद्र माहुरे, विलास पकडे, विनोद वाकोडे, सुरेश तंतरपाळे, सुनील राऊत, प्रवीण यादव, गजानन बाभूळकर, मनोज धवणे, उल्हास राठोड, विघे यांची उपस्थिती होती.