अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांचा ठिय्या; अनुदान न मिळाल्यास राहुटी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 12:38 PM2022-06-29T12:38:52+5:302022-06-29T12:46:31+5:30
तत्काळ थकीत डी.बी.टी. देण्याच्या मागणीला घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले.
अमरावती : विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ स्वयंम योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक अनुदान देण्यात येते. मात्र २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील डी.बी.टी. अजूनही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे तत्काळ थकीत डी.बी.टी. देण्याच्या मागणीला घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच अनुदान जमा न झाल्यास राहुटी आंदोलनही करू, असा इशाराही यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
अति दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थीशिक्षणासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरून जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला येऊन शिक्षण घेतात. या काळात विद्यार्थी स्वयंम योजनेच्या आशेवर भाडेतत्त्वावर रूम करून राहतो. खानावळी, शैक्षणिक साहित्य, या सर्व खर्चासाठी विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून घरी बसण्याची वेळ आली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गत वर्षांपासूनचे रूम भाडे थकल्याने घर मालक रूम खाली करण्यास सांगत आहे. त्यामुळे उर्वरित थकीत असलेली डी.बी.टीचे अनुदान तत्काळ देण्यात यावे, या मागणीला घेऊन मंगळवारी शेकडो विद्यार्थी अप्पर आयुक्त आदिवासी विभागावर पोहोचले.
यावेळी अजूनही अनुदान जमा झाले नसल्याचे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे उर्वरित डी.बी.टी देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली.