चिंताजनक ! एकेका रुग्णाला चक्क ३० सलाईन, आरोग्य यंत्रणा 'अॅक्टिव्ह मोड'वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 12:30 PM2022-07-12T12:30:58+5:302022-07-12T13:08:40+5:30
‘उकू-टुकू’, ‘पतलाय हीजू लकेन’ने (कॉलरा-डायरिया) पाचडोंगरी- कोयलारीवासी त्रस्त
अनिल कडू/ मनीष तसरे
पाचडोंगरी-कोयलारी : मेळघाटातील पाचडोंगरी व कोयलारी येथील आदिवासी मागील पाच दिवसांपासून अतिसाराने ग्रस्त आहेत. रुग्णालयासह शाळांमधील उपचार केंद्रात हे त्रस्त आदिवासी प्रशासनाकडून अतिसाराच्या उपकेंद्रानंतर गावातच स्थापित केलेल्या उपचार केंद्राकडे धाव घेत आहेत. रुग्ण स्थिर होईस्तोवर सलाईन दिले जात होते. दाखल रुग्णाला होणाऱ्या शौचाच्या संख्येवर या सलाईनची संख्या ठरविली जात असल्याचे नाइलाज वैद्यकीय चमूने व्यक्त केले. सलाईनमुळे काही रुग्णांचे हातही सुजले आहेत.
लोकमत चमूने या गावांना भेट दिली असता अतिसाराची दाहकता समोर आली. आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली असून पाचडोंगरी येथील घराघरातील प्रत्येकाला कॉलरा प्रतिबंधात्मक डोस दिला गेला आहे. यात 'डॉक्सिसायक्लिन' तीनशे मिलिग्रॅमच्या तीन गोळ्या एकाच वेळी दिल्या जात आहेत.
खबरदारी म्हणून स्वतः डॉक्टरांनीही हा प्रतिबंधात्मक डोस घ्यायला सुरुवात केली आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गावातील रुग्णांवर जमिनीवरच उपचार केले जात आहेत. याला चुरणी ग्रामीण रुग्णालयही अपवाद ठरलेले नाही. यात रुग्णांना मोठ्या प्रमाणात सलाईन दिले जात आहे. पण, शाळांमधील उपचार केंद्रात सलाईन स्टॅन्ड उपलब्ध नसल्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणेने शाळेच्या खिडक्यांना दोऱ्या बांधल्या व त्यांना त्या सलाईन बॅग लटकविल्या. वेळप्रसंगी सलाईन तीव्र आवेगाने रुग्णाच्या शरीरात सोडण्यासाठी डॉक्टरांना हातात सलाईन धरावी लागत आहे.
साथरोगाचे नेमके कारण काय?
पाचडोंगरी, कोयलारी येथील साथरोगाचे नेमके कारण काय, याविषयी आदिवासी बांधव आजही अनभिज्ञ आहेत. दूषित पाण्यामुळे, पिण्यास अयोग्य पाणी प्यायल्यामुळे ही साथ उद्भवल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. दरम्यान, या गावांमध्ये यापूर्वी कधीतरी ही कॉलराची साथ येऊन गेली असावी. यातून सावरल्या गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात कॉलराचे जंतू राहिले असतील. तीच वयोवृद्ध व्यक्ती आजही कॉलराने बाधित झाली असेल आणि त्यापासून ही लागण पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘उकू-टुकू’, ‘पतलाय हिजू लकेन’ने त्रस्त
‘उकू-टुकू’, ‘पतलाय हिजू लकेन’ने त्रस्त आहेत. हे त्रस्त आदिवासी प्रशासनाकडून अतिसाराच्या उपकेंद्रानंतर गावातच स्थापित केलेल्या उपचार केंद्राकडे धाव घेत आहेत. दोन्ही गावांमध्ये ‘उकू-टुकू’, ‘पतलाय हिजू लकेन’ (कॉलरा-डायरिया) ची साथ पसरली आहे. यातील रुग्णांना पांढऱ्या रंगाची पातळ संडास होते. आरोग्य विभागाने या गावांमध्ये व परिसरात कॉलरा या साथरोगाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे.
कॉलराचे जंतू अनेक वर्षे एखाद्या बाधित व्यक्तीच्या शरीरात राहू शकतात. कालांतराने पुढे हीच व्यक्ती परत बाधित झाल्यास ही कॉलराची साथ पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते.
डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.