महानगरातील ८७ इमारती अतिधोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:20 AM2019-08-01T01:20:43+5:302019-08-01T01:21:24+5:30
महापालिका हद्दीत मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक अशा ८७ इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक ३३ मालमत्तांच्या मालक-भोगवटदारांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या.
गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका हद्दीत मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक अशा ८७ इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक ३३ मालमत्तांच्या मालक-भोगवटदारांना महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या. या इमारती तत्काळ निष्कासित न केल्यास वीज व पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. प्रसंगी महापालिकाद्वारे पाच इमारती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.
महानगरातील पाचही झोनमधील मोडकळीस आलेल्या इमारतींची पाहणी महापालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या प्रवर्गामध्ये जुन्या इमारतींची वर्गवारी करण्यात आलेली आहे. पाच झोनमध्ये अशा ८७ इमारतींचा समावेश आहे.
शिकस्त झालेल्या पाच इमारती यापूर्वीच पाडण्यात आल्या. चंद्रकांत बामरेकर, सत्यनारायण मंदिर ट्रस्ट, नारायनसिंह बैस व भाजीबाजारातील प्रमोद दम्माणी यांच्या इमारती धोकादायक असल्याने निष्कासित करण्यात आल्यात.
दरम्यान, मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता रवींद्र पवार यांनी दिली. यामध्ये सी-१ प्रवर्गात मोडणाऱ्या इमारतींना महापालिका अधिनियमाच्या कलम ३५४ (१) अन्वये नोटीस बजावून इमारत निष्कासित करण्यास सांगण्यात आलेले आहे. इमारत रिकाम्या करण्यापूर्वी त्यामधील भाडेकरू, सदनिकाधारक यांच्या ताब्यात असलेले चटर्ईक्षेत्र मोजून त्याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इमारती निष्कासित करण्यास अडथळा निर्माण झाल्यास त्या इमारतीची वीज व पाण्याची जोडणी खंडित करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शिकस्त असलेल्या खासगी इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
मनाई आदेश उठविण्यासाठी न्यायालयास विनंती
झोन क्रमांक २ मधील अतिधोकादायक व शिकस्त झालेल्या इमारतींचे मालक व भोगवटदार यांची पाच प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यामध्ये मालवीय चौकात प्रणय मालवीय, वसंत टॉकीजजवळील जुगलकिशोर गिल्डा, पंचशील टॉकीजजवळील विमल किशोर सिकची, राजकमल चौकातील गिरीश मेहता, खापर्डे वाडा, विनोद खंडेलवाल व बाखडेवाडी येथील हरिचरणसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. ५ आॅक्टोबर २०१५ च्या निकषाप्रमाणे सी-१ वर्गवारीत मोडत असल्याने या ठिकाणी दुर्घटना नाकारता येत नाही. या इमारतीवरील मनाई आदेश उठविण्यासाठी संबंधित न्यायालयात पाठपुरावा करण्याबाबत शहर अभियंत्यांनी महापालिकेच्या विधी अधिकाऱ्यांना पत्र दिले.
झोन २ व ५ मध्ये धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. अतिधोकादायक ३३ इमारतींची संबंधित अभियंत्यासमवेत पाहणी केली. काही इमारती निष्कासित करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला. न्यायप्रविष्ट इमारतींच्या निवाड्यासाठी विधी अधिकाºयांचा पाठपुरावा सुरू आहे.
रवींद्र पवार, शहर अभियंता
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिधोकादायक व धोकादायक या दोन्ही प्रकारांतील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट रहिवासी व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, महानगरपालिकेत नको त्या बाबतीतही राजकारण शिरते.
- सतीश देशमुख
स्थापत्य अभियंता