अमरावती जिल्ह्यात डेल्टा प्लसचे सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:58+5:302021-08-25T04:17:58+5:30
पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल : शंभर नमुन्यांची तपासणी अमरावती : जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्यात संत गाडगेबाबा अमरावती ...
पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल : शंभर नमुन्यांची तपासणी
अमरावती : जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू तपासणी प्रयोगशाळेने पाठविलेल्या शंभर नमुन्यांपैकी सहा रुग्णांचा डेल्टा प्लसचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेकडून हा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. यात दोन ग्रामीण भागातील, तर चार रुग्ण अमरावती शहरातील आहेत .
कोरोनाचा उद्रेक संपल्याचे चित्र निर्माण झाले तोच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने नवे संकट उभे झाले आहे. राज्यात आजतागायत डेल्टा प्लसचे १०३ रुग्ण आढळले असून सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार २१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात गडचिरोली सहा, नागपूर पाच, अहमदनगर चार, यवतमाळ तीन, नाशिक दोन, तर भंडारा जिल्ह्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यात आरोग्य यंत्रणेकडून पाठविण्यात आलेले नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे. अहवालानुसार पॉजिटिव्ह रुग्णांची माहिती संबंधित जिल्ह्यातील आरोग्य विभागाला देण्यात येणार आहे. रुग्णाच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यात येणार आहे. डेल्टा प्लसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहनदेखील आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
-------------------
जून-जुलै या महिन्यातील डेल्टाचे संशयित १०० नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याअनुंषगाने या नमुन्यांचा अहवाल सोमवारी प्राप्त झाला. अमरावती जिल्ह्यातील एकूण सहा नमुने डेल्टा प्लसचे आढळले आहेत. यातील दोन रुग्ण ग्रामीण व चार शहरी भागातील आहेत.
- डॉ. पी.व्ही. ठाकरे, नोडल अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विषाणू तपासणी प्रयोगशाळा