भीषण आगीत सहा कुटुंब उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:34 PM2019-03-01T22:34:47+5:302019-03-01T22:35:56+5:30
स्थानिक आदिवासीनगरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा कुटुंबीयांची घरे जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. अग्निशमन दलाने अथक परिश्रमातून चार तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत सहा घरांतील सर्व साहित्य भस्मसात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक आदिवासीनगरात गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सहा कुटुंबीयांची घरे जळून खाक झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले. अग्निशमन दलाने अथक परिश्रमातून चार तासांनंतर आग नियंत्रणात आणली. मात्र, या आगीत सहा घरांतील सर्व साहित्य भस्मसात झाले.
हॉटेल महफील लगतच्या आदिवासीनगरात नाल्याच्या काठावर टिनांची घरे बांधून काही नागरिक वास्तव्यास आहेत. गुरुवारी रात्री १ च्या सुमारास तेथील प्रमोद उईके नामक मुलगा लघुशंकेसाठी घराबाहेर निघाला असता, त्याला एका घराच्या मागील बाजूला लागलेल्या प्लास्टिकच्या पन्नीला आग लागल्याचे दिसले. प्रमोदने तात्काळ तेथील रहिवाशांना झोपेतून उठवून घटनेची माहिती दिली. त्यामुळे झोपलेली सर्व कुटुंबे घराबाहेर पडली.
दरम्यान, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने तेथील दिनेश धुर्वे, विनोद उईके, शंतनु धुर्वे, इंदिरा पेंदाम, राजू धुर्वे व अशोक पुरके यांची घरे आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेच्या माहितीवरून अत्यंत अरुंद रस्त्यावरून अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. त्यांनी तात्काळ आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. तरीसुद्धा तीन ते चार तासांपर्यंत हा आगीचा तांडव सुरूच होता. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमनला यश मिळाले.
पुन्हा सावरण्याचे प्रयत्न
आगीत दिनेश धुर्वे, विनोद उईके, शंतनु धुर्वे, इंदिरा पेंदाम, राजू धुर्वे व अशोक पुरके यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. शुक्रवारी सर्व कुटुंबीय आपआपल्या जळालेल्या घराचे निरीक्षण करून, पुन्हा संसार कसा सावरावा, या चिंतेत बसले होते. चिमुकल्या मुली आपल्या शालेय पुस्तकांचा शोध घेत होते. काही जण जळालेल्या छायाचित्रांना न्याहाळत होते. संसार कसा पुन्हा उभा राहील, याची चिंंता सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
तीन सिलिंडरचा स्फोट
भीषण आगीत लागोपाठ तीन स्फोटाचे आवाज नागरिकांना आले. ते सिलिंडरचे होते. आगीचे तांडव पाहून आजूबाजूच्यांनी आपआपल्या घरातील सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलविली.
दाहक अनुभव
आगीचे लोळ ३० फूट उंचीपर्यंत उठल्याचे नागरिक सांगत आहे. आगीच्या रौद्र रूपामुळे शेजारी चिंतेत पडले होते. दरम्यान शेजाऱ्यांच्या घरापर्यंत आगीची दाहकता पोहोचल्यामुळे तेथेही आग लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, धनराज कुंभरे यांच्याकडील एमएच २७ वाय ६४२२ या क्रमांकाची दुचाकी एका बाजूने जळाली.