एक वर्षापूर्वी विहिरीत फेकल्या सहा लाखांची औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:12+5:302021-06-05T04:10:12+5:30
(फोटो आहे. ) अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील इंदला गावाजवळील इंडो पब्लिक स्कूलजवळून जाणाऱ्या मार्गातील एका विहिरीत सापडलेला औषधांचा ...
(फोटो आहे. )
अमरावती : फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील इंदला गावाजवळील इंडो पब्लिक स्कूलजवळून जाणाऱ्या मार्गातील एका विहिरीत सापडलेला औषधांचा साठा एका मेडिकल स्टोअर संचालकाच्या मालकीचा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सदर औषधसाठा औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी सकाळी जप्त केला. त्याची किंमत पाच ते सहा रुपये असल्याचे एफडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, सदर औषधे एक वर्षांपूर्वी विहिरीत फेकली होती. सिपला व सम्राट कंपनीची ही औषधे असल्याचे औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी मेडिकल स्टोअर संचालकावर इंदला ग्रामपंचायतीने ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. मात्र, वृत्त लिहिस्तोवर एफडीएची कारवाई सुरू होती. शाळेपासून काही अंतरावर एका अर्धवट बांधकाम केलेल्या विहिरीत १५ ते २० पोत्यांमध्ये भरून हा औषधसाठा फेकून दिला होता. यापैकी काही औषधांची मुदत संपली नसल्याचे पुढे आले.
पोलीस आयुक्त आरती सिंह यांना याबाबत माहिती मिळताच त्यांच्या आदेशाने फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम व पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तसेच औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मनीष गोतमारे हेसुद्धा घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी केली असता, सदर औषधे एका भंगारविक्रेत्याने फेकल्याचे समोर आले.
गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सिंधी चौकातील अजय ठाकुरानी यांच्या मालकीची रिद्धी सिद्धी फार्मा आहे. मे २०२० मध्ये फार्मा दुकानाला आग लागल्याने काही औषधे व फर्निचर जळाले होते. त्यामुळे येथील साहित्य व औषधे भंगारात विकण्यात आली होती. हीच औषधे विहिरीत फेकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. अशा प्रकारे ग्रामंपचायत हद्दीत औषधी फेकल्यामुळे ५० हजारांचा दंड आकारण्यात आल्याचे ग्रामसचिव अरुण काळपांडे यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन मगर, सहायक निरीक्षक जितेश कानपुरे, पोलीस नाईक दिनेश मिश्रा, शशिकांत नाईक व ग्रामपंचायतचे सचिवदेखील होते.
कोट
औषधी सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार पाच ते सहा लाखांचा अर्धवट जळालेला औषधसाठा जप्त केला. सदर औषधसाठा विनापरवाना विक्री केला असेल, तर ते तपासून कारवाई केली जाईल.
उमेश घरोटे, सहायक आयुक्त, औषध प्रशासन विभाग