बच्चू कडूंजवळ सहा लाख रोख; १० लाखांचे कर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:57 PM2024-10-30T12:57:21+5:302024-10-30T12:58:25+5:30
Amravati : ५५ लाखांच्या मालमत्तेची नोंद
गजानन मोहोड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिव्यांगांसह सर्वसामान्यांसाठी शासनावर सातत्याने प्रहार करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कड्डू पाचव्यांचा रिंगणात आहे. त्यांनी सोमवारी प्रहार पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याजवळ सहा लाखांची कॅश असल्याचे नमूद केले आहे.
कडू यांची जंगम मालमत्ता ५०.३८, लाख, तर स्थावर मालमत्ता ५५.५५ लाख आहे. त्यांच्यावर १०.८७ लाखांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे ५९.६९ लाखांची जंगम, तर २.४५ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे शपथपत्रात नमूद आहे. सन २०१९ मध्ये बच्चू कडू यांच्याजवळ ३०.८१ लाखांची जंगम व १.१८ कोटींची स्थावर मालमत्ता व ९०.८१ लाखांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद होते. कडू यांच्या मुंबईस्थित एसबीआय खात्यात २.३१ लाख, बेलोऱ्याच्या एडीसीसी खात्यात ९.५० लाख जमा आहेत. प्रहार फूड लिमिटेडमध्ये चार लाखांचे शेअर्स, दोन एलआयसी पॉलिसीज, ४५ ग्रॅम सोने व अर्धा किलो चांदी आहे. त्यांच्या मालकीचे १८ लाखांची चारचाकी आहे त्यांच्या पत्नी नयना कडू यांच्या विविध बँक खात्यात १४.०७ लाख जमा आहे.
दोन दशकात विविध जिल्ह्यांत ४९ गुन्हे दाखल
- दोन दशकात राज्यातील अनेक • जिल्ह्यांत आलेल्या विविध आंदोलनात बच्चू कडू यांच्याविरुद्ध तब्बल ४९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये काही प्रकरणात निर्दोष, काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.
- बच्चू कडू यांची मौजा शिवंगा २ व मौजा शर्यतपूर शिवारात १० एकर जमीन आहे. याच शिवारात कडू यांच्या पत्नीच्या नावे २१ एकर शेती व काही प्लॉट आहे. शिवाय कडू यांच्याही नावे दोन प्लॉट आहेत.
- आयकर विवरणानुसार बच्चू कडू यांचे सन २०१९-२० मध्ये वार्षिक उत्पन्न २६,५५ लाख होते, तर सन २०२३-२४ मध्ये ६४.३० लाखांचे झालेले आहे. त्यांच्या पत्नीच्याही उत्पन्नात दुपटीने वाढ झालेली आहे.