अंजनगाव सुर्जीत सहा जिवंत काडतूस, पिस्तूल पकडली; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 02:41 PM2022-12-09T14:41:30+5:302022-12-09T14:42:56+5:30
चार दिवसांपूर्वी देखील पकडल्या होत्या पिस्तुली, स्थानिक पोलिसांचे यश
वनोजा बाग/अंजनगाव सुर्जी (अमरावती) : अंजनगाव सुर्जी शहरात ४ नोव्हेंबर रोजी तीन गावठी पिस्तूल व आठ काडतूस जप्त करण्यात आले होते. त्यानंतर चारच दिवसांनी पोलिसांनी आणखी एक पिस्तूल व सहा जिवंत काडतूस कळमगव्हाण येथील नाल्याच्या परिसरातून जप्त केले.
अंजनगाव सुर्जी हे अवैध हत्याराचे खरेदी-विक्री केंद्र ठरण्याकडे वाटचाल सुरू आहे. ४ डिसेंबर रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी तालुक्यातील लखाड गावात एका घरावर छापा टाकून तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतूस जप्त केले. याप्रकरणी मोहम्मद नावेद अब्दुल सलीम (३०, रा. लखाड) यास अटक करण्यात आली होती. चारच दिवसांनी गुरुवारी गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील पानअटाई येथील रहिवासी रिझवान खान ऊर्फ सोनू नासीर खान (२६) या दूधविक्रेत्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने सांगितलेल्या ठिकाणाहून एक पिस्तूल व सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
लखाड गावात पोलिसांनी मोहम्मद नावेद याला तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसांसह पकडल्याची बातमी शहरात पसरताच आरोपी रिझवान खान याने पकडले जाण्याच्या भीतीने आपले पिस्तूल परतवाडा मार्गातील व अचलपूर तालुक्यातील गळंकी गावाजवळील पुलाखाली लपविले होते. अंजनगाव पोलिसांनी आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळावरून हे अग्निशस्त्र जप्त केले. या पिस्तूल व जिवंत काडतुसांची किंमत ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिस जमादार विजय शेवतकार यांच्या फिर्यादीवरून अंजनगाव पोलिस ठाण्यात भादंविचे कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी रिजवान खान नसीर खान याला अटक करण्यात आली आहे. करून अटक, नव्या जमान्यातील तरुणांमध्ये पिस्तूल ठेवण्याचा छंद वाढला आहे, त्यामुळे काही तरुण मध्यप्रदेश व इतर ठिकाणाहून पिस्तूल आणून शहरात चढ्या भावाने विकत आहेत.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वानखडे, पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड, विजय शेवतकर, कमलेश मुराई, जयसिंह चौहान, विशाल थोरात, शुभम मार्कंड, देवानंद पालवे यांनी ही कारवाई केली.