अपहरणप्रकरणी सहा जणांना तीन वर्षांचा कारावास
By Admin | Published: January 17, 2015 12:50 AM2015-01-17T00:50:31+5:302015-01-17T00:50:31+5:30
अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले ...
अमरावती : अपहरण प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने सहा आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली असून यामध्ये नगरसेवक विलास इंगोले व त्यांचा भाऊ नितीन इंगोले यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ४ फेबु्रवारी २०१० रोजी शहर कोतवाली ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.
सुबोध कॉलनीतील रहिवासी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी पुडंलिक बापू तुरखेडे यांचे २ फेब्रुुवारी २०१० मध्ये अपहरण करुन आरोपींनी त्यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न केला. या घटनेची तक्रार ४ फेब्रुवारी २०१० रोजी पुंडलिक तुरखेडे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी १० आरोपींविरुध्द भादंविच्या १२० (ब), ३४२, ३५५, ४५२, ३८६, ३८७, ३८८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत शिरभाते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सीमा दाताळकर यांच्याकडे तपासाची सूत्रे होती.
पोलिसांनी एप्रिल २०१० मध्ये न्यायालयात चार्जशिष्ट दाखल केल्यावर न्यायालयाने २४ साक्षीदार तपासले.
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. भोसले यांच्या न्यायालयाने विलास महादेव इंगोले, नितीन इंगोले (दोन्ही राहणार बुधवारा), अश्विनी भास्कर देशमुख (२९,रा. नंदनवन कॉलनी), व आशिष प्रकाश वानखड े(२६,रा. आमला विश्वेश्वर) यांची निर्दोष सुटका केली आहे. तर आरोपी अफसर खा मीय्या खा (४२,रा. पठाणपुरा) नंदकिशोर मधुकर राऊत (३५,रा. नंदनवन कॉलनी), विशाळ पंजाब भंडागे(२५,रा. घाटलाडकी), अमोल बाबाराव रिठे (२५, रा. वरुडा), संदीप ऊर्फ पप्पू नंदलाल बंग (३८,रा. जुना कॉटन मार्केट रोड) व सचिन नामदेव भागवत (३०, रा. निरुळ गंगामाई) यांना ३ वर्षांची शिक्षा तसेच प्रत्येकी २२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे अमर देशमुख यांनी युक्तिवाद केला असून त्यांचे सहकारी महावीर भंडारी यांनी सहकार्य केले आहे.
(प्रतिनिधी)