‘डीपीसी’त सहा अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:46 AM2017-09-02T00:46:07+5:302017-09-02T00:46:49+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या ३२ पैकी ६ जागा अविरोध निवडून आल्याने उर्वरित २६ जागांसाठी येत्या १० सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्हा नियोजन समितीच्या ३२ पैकी ६ जागा अविरोध निवडून आल्याने उर्वरित २६ जागांसाठी येत्या १० सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत तर जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण मतदारसंघातून ४ उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. यात काँग्रेसचे महेंद्रसिंग गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर व भाजपचे रवींद्र मुंदे, प्रवीण तायडे यांचा समावेश आहे.
महापालिकेतून अनुसूचित जाती महिलामधून भाजपच्या राधा कुरील आणि नगरपालिकेतून नामाप्र महिलांमधून अंजनगाव सुर्जी येथील भाजपच्या नगरसेविका सुनीता मुरकुटे अविरोध निवडून आल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या २६ जागांमध्ये जिल्हा परिषदेतून १६ महापालिकेतून ६ आणि नगपालिका मतदारसंघातून ३ व नगरपंचायतीमधून एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. चारही मतदारसंघातून ४५ उमेदवार रिंगणात आहेत. १ सप्टेंबर रोजी अखेरच्या दिवशी ९५ पैकी ४० जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. झेडपीच्या नियोजन समितीवर एकूण २० सदस्य निवडले जातात. जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांप्रमाणेच नियोजन समितीच्या निवडीदेखील अविरोध होतील, अशी चर्चा असतानाच नियोजन समितीच्या सदस्यत्वावर काँग्रेस, भाजप, शिवसेना, बसप, अपक्ष, युवा स्वाभिमाननेही दावा केल्याने अखेरच्या दिवशी १६ जागांसाठी २२ जिल्हा परिषद सदस्य रिंगणात राहिले आहेत. महापालिकेतून आता ६ जागांकरिता १२ उमेदवार रिंगणात आहेत. नगरपालिकेच्या शिल्लक तीन जागांसाठी ८ उमेदवार रिंगणार आहेत. नगरपंचायतींच्या एका जागेसाठी ८ उमेदवार रिंगणात असून नामनिर्देशपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या वेळेपर्यंत जि.प., मनपा मतदारसंघाच्या जागांसाठी दोन दिवसापासून काँग्रेस व भाजप, शिवसेना व सहकारी पक्षात वाटाघाटी सुरू होत्या. मात्र त्या ऐनवेळी फिस्कटल्याने नियोजन समितीची निवडणूक अविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीच्या २६ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहा जण अविरोध
डीपीसीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी जि.प.सर्वसाधारण मतदारसंघातून ४ जण अविरोध निवडून आलेत. यामध्ये भाजपचे रवींद्र मुंदे, प्रवीण तायडे तर काँग्रेसचे महेंद्रसिंग गैलवार, बाळासाहेब हिंगणीकर, मनपाच्या अनुसूचित जाती महिलामधून राधा कुरील व पालिका नामाप्र महिलांमधून सुनीता मुरकुटे हे सहा जण अविरोध निवडून आलेत.
डीपीसी निवडणूक अविरोध करण्यासाठी काँग्रेस व भाजपमध्ये चर्चा सुरू होती. परंतु यात काही निर्णय होऊ शकला नाही. तरीही मतदान प्रक्रियेपर्यत यावर दोन्ही पक्षांची चर्चा घडविण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेऊ.
-वीरेंद्र जगताप,
आमदार, धामणगाव रेल्वे
अविरोध निवडीसाठी भाजपला ८ जागा तर काँग्रेसला १२ याप्रमाणे चर्चा केली. मात्र, ९ जागांची मागणी भाजपने केली. झेडपीतील बहुमत व मतदानाचा विचार करता हा प्रस्ताव अमान्य होता. आता निवडणुकीची तयारी आहे.
-बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
निवडून आलेल्या सदस्यांमधून डीपीसीचे सदस्य निवडून द्यायचे आहेत. काँग्रेसचा ८ जागांचा प्रस्ताव होता. आम्ही ९ जागा मागितल्या त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने तोडगा निघू शकला नाही.
-दिनेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष भाजप