चैत्यभूमीसाठी रेल्वेच्या सहा विशेष गाड्या
By admin | Published: November 29, 2015 12:57 AM2015-11-29T00:57:46+5:302015-11-29T00:57:46+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर ...
६ ते ८ डिसेंबर दरम्यान धावणार : मुंबई, दादर येथून सुरु करण्याचा निर्णय
अमरावती : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई दरम्यान सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबईहून या गाड्या सुटणार असल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या असून या स्थळाचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी जातात. विदर्भातून अनुयायांची चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला ये-जा करणाऱ्या नियमित प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षणाचे तिकीट घेऊनही नियमित प्रवास करणाऱ्यांना जागा मिळत नाही. त्यामुळे १ ते १० डिसेंबर दरम्यान मुंबईकडे प्रवास करणारे अनेक नियमित प्रवासी रेल्वेने ये-जा करीत नाहीत. परिणामी रेल्वे प्रशासनाने यंदा सहा विशेष गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान या विशेष गाङ्या धावणार आहेत. परतीच्या प्रवासाठी या रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचे भुसावळ मध्ये रेल्वे वाणिज्य विभागाने कळविले. (प्रतिनिधी)
मुंबईहून अशा सुटतील रेल्वे गाड्या
६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नागपूर (गाडी क्र. ०१०६९) ही गाडी सुटेल. ही गाडी नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. तसेच याच दिवशी गाडी क्र.०१०७१ ही छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सेवाग्राम दरम्यानची गाडी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांंनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ७ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र.०१०७३) दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. मुंबई ते नागपूर (गाडी क्र.०१०७५) ही दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ८ डिसेंबर रोजी दादर ते नागपूर (गाडी क्र. ०१०७३) ही रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार असून नागपूर येथे ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता पोहोचणार आहे.
येथे थांबतील विशेष गाड्या
छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई), दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, जलंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी, नागपूर.