सहा ठाण्यांची सुत्रे पोलीस निरिक्षकांकडे, १४ ठाणे एपीआयकडे; अंतर्गत बदल
By प्रदीप भाकरे | Published: February 1, 2024 01:02 PM2024-02-01T13:02:12+5:302024-02-01T13:02:21+5:30
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी काढले आदेश
अमरावती: लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमिवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ग्रामीणमधील ठाण्यांना नवे प्रमुख दिले आहेत. त्यात सायबरसह सहा ठाण्यांची सुत्रे पोलीस निरिक्षकांकडे, तर, १४ ठाण्यांची ठाणेदारकी सहायक पोलीस निरिक्षकांकडे देण्यात आली आहे.
एसपींच्या ३१ जानेवारीच्या आदेशानुसार, नियंत्रण कक्ष, सायबर, जिल्हा वाहतूक शाखेसह पाच ठाण्यांची जबाबदारी आठ पोलीस निरिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरिक्षक प्रशांत मसराम हे तेथेच प्रभारी अधिकारी असतील. तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक सुरेश म्हस्के हे तिवसा, नितीन देशमुख हे दत्तापूर, प्रदीप शिरस्कर हे अचलपूर तर, गिरिश ताथोड हे सायबर ठाण्याचे ठाणेदार असतील. नियंत्रण कक्षात कार्यरत पोलीस निरिक्षक सतिश पाटील हे विशेष शाखा व जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख असतिल. ते गोपाल उंबरकर यांची जागा घेतील. सायबर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय अहिरकर यांना चांदूररेल्वेचे ठाणेदार बनविण्यात आले आहे. तर, पोलीेस निरिक्षक सुनिल सोळंके हे नांदगाव खंडेश्वर ठाण्याचे नवे प्रमुख असतिल.
सहायक पोलीस निरिक्षक ठाणे प्रभारी
सहायक पोलीस निरिक्षक शिवहरी सरोदे परतवाड्याचे, सोपान भाईक हे सरमसपुरा, सुनिल पाटील हे पथ्रोटचे ठाणेदार असतील. खल्लारची जबाबदारी सहायक पोलीस निरिक्षक मनोज सुरवाडे, रहिमापुरची विनोद धाडसे, शिरजगाव कसबाची जबाबदारी महेंद्र गवई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सुलभा राऊत या मंगरूळ दस्तगीरच्या, रवींद्र बारड हे मंगरूळ चव्हाळा, अनुप वाकडे हे कुऱ्हा, तर सचिन पाटील हे शिरखेडचे नवे ठाणेदार अर्थात प्रभारी अधिकारी असतील. सचिन लुले यांच्याकडे शिरखेड, विष्णू पांडे यांच्याकडे माहुली, किरण औटे यांच्याकडे येवदा, तर वैभव महांगरे यांच्याकडे खोलापुरची ठाणेदारकी देण्यात आली. नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरिक्षक संदीप चव्हान हे अचलपूर वाहतूक शाखेचे प्रमुख असतील.