मेळघाटात सहा वाघांची शिकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:17 PM2018-12-12T14:17:06+5:302018-12-12T14:18:57+5:30

मेळघाटात शिकारीत सहा वाघ मारले गेले. यात एकाची बंदुकीच्या गोळीने, तर पाच वाघांवर विषप्रयोग करण्यात आला. यात दोन बिबटांचा समावेश आहे. मृत वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Six Tigers hunting in Melghat? | मेळघाटात सहा वाघांची शिकार?

मेळघाटात सहा वाघांची शिकार?

googlenewsNext
ठळक मुद्देआकडा वाढणारएकाची बंदुकीने, पाच वाघांवर विषप्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
अनिल कडू
अमरावती : मेळघाटात शिकारीत सहा वाघ मारले गेले. यात एकाची बंदुकीच्या गोळीने, तर पाच वाघांवर विषप्रयोग करण्यात आला. यात दोन बिबटांचा समावेश आहे. मृत वाघांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, या आरोपींची वनकोठडी संपल्यामुळे त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. त्या आरोपींना कोठडीत घेण्याकरिता पूर्वमेळघाट वनविभागाने सोमवारी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने तो अर्ज मान्य केल्याने यातील तिघांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पूर्वमेळघाट वनविभाग आपल्या स्तरावर स्वतंत्र चौकशी करणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदरा वनपरिक्षेत्र आणि पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत दहीगाव अंजनगाव वनपरिक्षेत्राच्या सीमेवर गिरगुटी क्षेत्रात हे वाघ मारले गेले. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रालगतच्या पूर्वमेळघाट वनविभागाकडील बफर क्षेत्रात सर्वाधिक वाघ मारले गेल्याचा दावा व्याघ्र प्रकल्पाने केला आहे. एक नव्हे, चक्क दहा वाघ बफर क्षेत्रात मारले गेल्याची शक्यता व्याघ्र प्रकल्पाने वर्तविली आहे.
व्याघ्र प्रकल्पांतर्गत वैराट, कोहा, कुंड या गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मनुष्यविरहित या क्षेत्रात वन्यजीवांचा मुक्त संचार गिरगुटीपर्यंत आहे. वाघाने केलेल्या शिकारीवर विषारी औषध टाकले गेले, तर एका वाघाला चक्क बंदुकीने मारण्यात आल्याची मौखिक कबुली आरोपींनी दिली आहे. त्यात कुठले विष वापरण्यात आले हेसुद्धा त्यांनी सांगितले. मात्र, शिकारीकरिता वापरलेली बंदूक चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेली नाही. प्रत्येक आरोपीकडून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे.

वाघांची शिकार झाली हे खरे आहे. वाघ शिकारीची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरच मृत वाघांची निश्चित आकडेवारी सांगता येईल.
- विनोदकुमार शिवकुमार, उपवनसंरक्षक, गुगामल वन्यजीन विभाग, परतवाडा

नेमक्या किती वाघांची शिकार झाली, हे सांगता येणार नाही. याबाबत चौकशी सुरू आहे. मृत वाघांचे अवयव अद्याप मिळालेले नाहीत. शिकारीचे निश्चित स्थळही पुराव्यासह हाती लागलेले नाही.
- अविनाशकुमार, उपवनसंरक्षक, पूर्वमेळघाट वनविभाग, चिखलदरा

Web Title: Six Tigers hunting in Melghat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ