कारागृहाच्या उडान उपक्रमात कौशल्य विकास, विक्री केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:10 AM2021-06-29T04:10:06+5:302021-06-29T04:10:06+5:30
पालकमंत्र्यांची उपस्थिती, बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम अमरावती : 'उडान' उपक्रम बंदीजनांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा ...
पालकमंत्र्यांची उपस्थिती, बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
अमरावती : 'उडान' उपक्रम बंदीजनांच्या कला कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळविणारा असून, त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसनासाठी मोलाचा ठरेल, असा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे सोमवारी व्यक्त केला.
अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या कौशल्य विकास व विक्री केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कारागृह अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते.
कारागृहात बंदीजनांतील कारागीर, कलावंताच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यातून अनेकविध सुंदर वस्तू व कलाकृतींची निर्मिती होते. या वस्तूंच्या विक्रीसाठी हे दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सृजनशीलतेला वाव देऊन सकारात्मकतेकडे वाटचाल करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नावीन्यपूर्ण योजनेत ५० लाखांच्या निधीतून हे केंद्र उभारण्यात आले आहे. तेथे बंदीजनांनी निर्माण केलेल्या अनेकविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.