बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण, शेतकरी मिशन आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 07:19 PM2018-02-27T19:19:11+5:302018-02-27T19:19:11+5:30
सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतक-यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, बोंडअळीने बाधित असलेल्या कापसाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकट शेतक-यांवर ओढावले आहे.
अमरावती : सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतक-यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, बोंडअळीने बाधित असलेल्या कापसाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकट शेतक-यांवर ओढावले आहे. यासाठी त्वचारोगाची लोगण झालेल्यांना मोफत उपचार करून बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शासनाकडे केली.
विदर्भ व मराठवाड्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतरचे वास्तव भयावह असल्याचे त्यांनी ‘लोकमत‘शी बोलतांना सांगीतले.या विषयी राज्य सरकारला दिलेल्या अहवालात सत्य अधोरेखित केले. गुलाबी बोंडअळी बाधित कापसातील जंतू मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यानेच गावखेड्यात सर्वत्र अॅॅलर्जी व प्रचंड खाजेच्या आजाराने शेकडोच्या संख्येने शेतकरी प्रभावित झाले आहेत व उपचाराच्या नावावर अनेकांची लूट होत असल्याच्या तक्रारी मिशनकडे आल्याचे ते म्हणाले.
गुलाबी अळ्यांच्या संकटाचा सामना करण्याकरिता कृषी, ग्रामविकास व महसूल विभागाचा सहभागासह शेतकºयांच्या सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. बोंडअळीग्रस्त पिके समूळ नष्ट करणे, जमिनीतील गुलाबी अळीच्या अंडी नष्ट करणे, कपाशीची फरतड न घेता काढून फेकणे, मॉन्सूनपूर्व कापसाची पेरणी टाळणे, पुढच्या वर्षी डाळीचे वा तेलबियांचे पीक घेणे, अमेरिकन कापसाचे बियाणे गुलाबी अळीचे निमंत्रक असल्यामुळे या कापसाच्या बियाणांच्या जागी देशी सरळ वाणाची लागवण करणे एकमेव उपाय कापूस उत्पादकांसमोर असल्यामुळे सरकारने कृषी खाते, केंद्रीय कापूस शोध संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद, कृषी विद्यापीठ यांना कामी लावणे गरजेचे असल्याचा सल्ला मिशनद्वारा राज्य शासनाला देण्यात आला.
प्रत्येक जिल्ह्यातच त्वचाविकाराचे आजार
सोनबर्डी येथे घरात साठविलेल्या कापसामुळे खाज व त्वचारोगाची लागण झाल्यामुळे शेतकºयांंनी अंगणात कापूस ठेवला. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव व झरी तालुक्यात बीटी कापसामुळे त्वचाविकाराची लागण झाल्याच्या शेकडो तक्रारी आल्यानंतर कै.वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील डीन मनीष शिरिगिरवार यांनी त्या तालुक्यात विषेश चमू पाठविली. यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी अॅलर्जी व त्वचाविकाराची सर्वच औषधी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून दिली आहे.