अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 12:06 AM2016-11-05T00:06:25+5:302016-11-05T00:06:25+5:30

जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे.

Slaughter of tree trees in Anjangaon | अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

Next

वनाधिकाऱ्यांचे अभय : महारुख, कडूनिंब, आंबा, वडाचे शेकडो टन लाकूड
अमरावती : जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. आरागिरणी मालकांसोबत वनाधिकाऱ्यांचे लांगेबांधे असल्यामुळे दररोज हजारो टन आडजात लाकूड आरागिरण्यांमध्ये फस्त होत आहे. वनाधिकाऱ्यांच्या अल्प लाभाच्या हव्यासापोटी जंगल नष्ट होत आहे.
एकीकडे उपवनसंरक्षक हेमंत मीना हे जंगलाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे अधिनस्थ वनाधिकारी, कर्मचारी आरागिरणी मालकांकडून चिरीमिरी घेऊन आडजात लाकडाच्या कटाईला मूकसंमती देत आहेत. वनविभागाचा कारभार ‘दिव्याखाली अंधार’ असा सुरू आहे. वरिष्ठ वनाधिकारी जंगल, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी धडपड करीत असले तरी कनिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दिवसाची सुरूवातच ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याशिवाय होत नाही. परिणामी जिल्ह्यात अवैध आडजात लाकूड कटाई करून मोठ्या प्रमाणात आणले जात आहे. अंजनगाव सुर्जी हे हल्ली आडजात लाकूड तस्करीचे केंद्र बनले आहे. शुक्रवारी कलाम सॉ-मिलमध्ये मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाई करून आणल्या जाणाऱ्या लाकडाचे छायाचित्र विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला पाठविले आहे. तसेच जुन्या बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या आर. के. स्टीलमध्ये देखील अवैध लाकूड आणले आहे. आडजात लाकूड कापण्याला मनाई असुनही परतवाडा वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. बारखडे आरागिरण्यांवर कारवाई का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे.

वृक्ष कटाईचे वास्तव वेगळेच
अमरावती : परतवाडा, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार आदी भागात अवैध लाकूड कापणे सुरुच असल्याची माहिती आहे. परंतु उपवनसंरक्षक हेमंत मीना आडजात वृक्षकटाई आणि आरागिरण्यांना अवैध लाकूड कापण्याबाबत आढावा घेतात तेव्हा ‘सर सब कुछ बंद है’ असा सूर सर्वच वनपरिक्षेत्राधिकारी आळवतात. मात्र, आडजात वृक्षकटाईची वास्तविकता वेगळीच आहे. यापूर्वी देखील अंजनगाव सुर्जी येथे शहानूर नदीच्या काठावर आडजात वृक्षांचे लाकूड मोठ्या प्रमाणात बेवारस आढळले होते. अखेर उपवनसंरक्षकांनी येथे धाडसत्र राबवून लाकूड जप्त केले होते. आरागिरणीत दरदिवसाला आणले जाणारे अवैध लाकूड रोखण्यासाठी उपवनसंरक्षकांनी आरागिरण्यांमध्ये आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवावे, अशी मागणी वृक्षप्रेमिंनी केली आहे. (प्रतिनिधी)

उपवनसंरक्षकांना दिली जाते खोटी माहिती
आरागिरणीत अवैध लाकूडकटाई सुरु असताना काहीच नियमबाह्य सुरु नसल्याची खोटी माहिती कनिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून उपवनसंरक्षकांना दिली जाते. वन विभागात ‘आॅलवेल’ असल्याचे भासवून आरागिरणी मालकांना अवैध व्यवसायासाठी बळ देण्याचे कटकारस्थान वनपरिक्षेत्राधिकारी, वनपालांकडून रचले जात असल्याचे चित्र आहे.

Web Title: Slaughter of tree trees in Anjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.