व्हीएमव्ही परिसरात वृक्षांची जाळून कत्तल
By admin | Published: May 29, 2017 12:05 AM2017-05-29T00:05:27+5:302017-05-29T00:05:27+5:30
विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील वृक्षांची जाळून कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला.
टोळी सक्रिय : प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील वृक्षांची जाळून कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. मध्यंतरी परतवाडा-दर्यापूर मार्गावर सुद्धा असाच प्रकार घडला होता. त्यामुळे झाडे जाळणारी टोळी शहरात सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे.
वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असताना अद्याप कारवाईसाठी ठोस पाऊले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळे वृक्षतोडीसंदर्भात कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे.
विनापरवानगी वृक्षतोड
अमरावती : यासंदर्भात शासन गंभीर असून वृक्षलागवडीचे निर्देश प्रशासकीय विभागांना दिले आहेत. प्रशासनामार्फत थातूरमातूर वृक्षारोपण केले जात असून दुसरीकडे वृक्षतोडीकडे मात्र प्रशासन डोळेझाक करीत आहे. काही महिन्यांपूर्वी रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी शेकडो झाडे तोडण्यात आलीत. दुसरीकडे इमारत बांधकामासाठी विनापरवानगी वृक्षतोड होत आहे. शनिवारी सकाळी व्हीएमव्ही परिसरातील बाभळीच्या शेकडो वृक्षांचे बुंधे जाळण्यात आले. आगीच्या तीव्र झळांमुळे ही झाडे कोमेजली आहेत. यासाठी जबाबदार कोण, हे मात्र अद्यापही कळू शकले नाही. विमविच्या पदाधिकाऱ्यांनीही याबाबत कुणाकडे तक्रार केली नाही.