निस्तेज समाजमन अन् प्रतीक्षाच्या आर्त किंकाळ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:02 PM2017-11-25T23:02:31+5:302017-11-25T23:04:29+5:30
भरदिवसा, भर चौकात राहुल भड हा पत्नी प्रतीक्षाच्या शरीरात चाकू भोसकत होता. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर बघ्यांनी तिकडे धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भरदिवसा, भर चौकात राहुल भड हा पत्नी प्रतीक्षाच्या शरीरात चाकू भोसकत होता. ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर बघ्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत तिची मैत्रिण श्वेताच एकटी तिला मदत मिळवून देण्यासाठी धडपडत होती.
साईनगरातील वृंदावन कॉलनी ही बºयापैकी वर्दळ असलेली. त्यामुळे येथे मदतीसाठी कुणीच कसे धावून आले नाही, ही चर्चा घटनेनंतर प्रत्येकाच्या ओठी आहे. प्रतीक्षाच्या आर्त किंकाळ्या व मैत्रीण श्वेता बायस्करची मदतीसाठी आर्त हाक समाजमन केवळ ऐकत होता. मात्र, मदतीसाठी धावून जाण्याचे धाडसच कुणाला झाले नाही. श्वेतानेच तिच्या परिचयातील राजेंद्र येते यांच्याकडून मदत मिळाविली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रतीक्षाला उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आणले. मात्र, काळ आला होताच. यामुळे श्वेताची धावपळ निष्फळ ठरली.
प्रतीक्षा मेहेत्रे व श्वेता बायस्कर या दोघी समवयस्क. छाबडा प्लॉटमध्ये शेजारीच राहतात. दर गुरुवारी दोघीही वृंदावन कॉलनी स्थित ओंकार मंदिरात दर्शनाला जायच्या.
कदाचित ती वाचली असती
अमरावती : २४ नोव्हेंबरचा दिवस प्रतीक्षासाठी काळ बनून येणार असल्याची कल्पनाही त्यांना नव्हती. प्रतीक्षा व श्वेता मंदिरातून दर्शन करून परत घरी जात होत्या. प्रतीक्षा तिची मोपेड चालवित होती, तर श्वेता मागे बसली होती. अचानक वृंदावन कॉलनीतील एका चौकात राहुल भड मागून आला आणि त्याने प्रतीक्षाच्या गाडीला लाथ मारली. त्यामुळे तिने गाडी थांबवून जाब विचारला. दोघांमध्ये दोन ते पाच मिनिटे बाचाबाची झाली. अचानक राहुलने प्रतीक्षावर चाकूने वार केले. एकीकडे प्रतीक्षाच्या किंकाळ्या, तर दुसरीकडे मदतीसाठी श्वेता आर्त हाक देत होती. मदतीला कोणीचा धावून येत नसल्याचे पाहून श्वेताही घाबरली होती. मात्र, मैत्रिणीचा जीव वाचविण्यासाठी काही करावे लागेल, हे तिला उमजले. तिने तत्काळ मंदिराकडे धाव घेऊन राजेंद्र येते यांना मदतीसाठी हाक दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ प्रतीक्षाला रुग्णालयात नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू केली. एका परिचिताची कार तेथून जात होती. येते यांनी मदत मागितली आणि श्वेता व एका महिला डॉक्टरच्या मदतीने प्रतीक्षाला कारमध्ये टाकून इर्विन रुग्णालयात आणले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला होता. प्रतीक्षाला मदत करणाºया श्वेताला उपस्थित नागरिकांनी मदत केली असती, तर कदाचित एक जीव वाचला असता. मात्र, तसे झाले नाही.