झोपडपट्टी दादा एक वर्षासाठी तुरुंगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:22 PM2019-03-17T22:22:42+5:302019-03-17T22:23:30+5:30
कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे.
xलोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे.
राजापेठ हद्दीत दादागिरी करणारा अशोक सरदार हा सन २००५ पासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. शस्त्रासह प्राणघातक हल्ले, गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ले करणे, हत्या, गंभीर दुखापत करणे, अश्लील शिवीगाळ करून मारण्याची धमकी देणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, घरफोडी, जबरी चोरी, जुगार, अवैध दारूची विक्री अशाप्रकारचे अशोक सरदारविरुद्ध १७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. राजापेठसह फ्रेजरपुरा व बडनेरा हद्दीतील हे गुन्हे आहेत. अशोक सरदारविरुद्ध अनेकदा प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यालाही जुमानत नसल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र त्यात कोणताही बदल झाला नाही. त्याच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले होते. त्याच्यासंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी पोलीस शिपाई पे्रम रावत यांच्या मदतीने अशोर सरदारविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्या प्रस्तावाची आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी व विधी अधिकारी विश्वास वैद्य यांच्यामार्फत पूर्तता करण्यात आली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अशोक सरदारविरुद्ध एमपीडीएची कारवाईची शिफारस पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्याकडे केली. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी शनिवारी १६ मार्च रोजी अशोक सरदारच्या स्थानबद्धचे आदेश पारीत केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी अशोक सरदारची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. अशोक सरदारला आता वर्षभर जेलमध्ये राहावे लागणार आहे.
दहशतीतून सुटका
झोपडपट्टी दादा अशोक सरदार तुरुगांत गेल्याने राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मद्यप्राशन करून नागरिकांना नाहक त्रास देणे, मारहाण करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा अशोक सरदारने तुरुगांत गेल्याने नागरिकांनी या दहशतीतून सुटका झाल्याचे समाधान व्यक्त केले