रिल्समध्ये पोलिसांविषयी अपशब्द; दोघांविरूद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Published: September 30, 2023 02:17 PM2023-09-30T14:17:27+5:302023-09-30T14:18:11+5:30
दोघांनीही मागितली माफी : पोलीस बॉईज संघटनेच्या माहितीवरून एफआयआर
अमरावती : येथील एका जोडीला इन्स्टाग्रामवरील रिल्समध्ये पोलिसांविषयी अपशब्द वापरणे चांगलेच महागात पडले आहे. पोलीस बॉईज संघटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी ते रिल्स बनविणाऱ्या व इन्स्टावर अपलोड करणाऱ्या दोघांविरूद्ध २९ सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे. परिक्षित लंगडे व शशांक उडाखे (दोघेही रा. अमरावती) अशी गुन्हा दाखल झालेल्या इन्स्टाग्राम अकाउंटधारकांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने तक्रार नोंदविली. विशेष म्हणजे त्या रिल्सवर खाकीमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याने त्या दोघांनी पोलिसांची माफी मागितली आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.
सध्या इन्स्टाग्राम रिल्स युजर्समध्ये ट्रेन्डिंग आहे. जेव्हापासून टिकटॉक बंद झाले, लोक इन्स्टाग्राम रिल्सच्या फिचरमार्फत व्हिडीओ तयार करुन अपलोड करत आहेत. तरुणाई इन्स्टाग्राम रिल्सच्या मोहातच पडली आहे. त्यातून अनेकांना उत्पन्नाचे स्त्रोत गवसले असताना लाखो जण मनोरंजनाकरीता रिल्सकडे वळले आहेत. मात्र अनेक रिल्समध्ये शिवराळ भाषेचा वापर केला जातो. अश्लिल कंटेट असणारे व्हिडीओ देखील अपलोड केले जातात. लंगडे व उडाखे यांच्यावर देखील अश्लिल व्हिडीओ बनवून तो पोस्ट केल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
काय आहे तक्रार
२९ सप्टेंबर रोजी दुपारी येथील एक पोलीस पाल्य त्याच्या मोबाईलमध्ये रिल पाहत असतांना ‘ऑफिशियल परिक्षित’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याला पोलिसांसंबंधित अश्लिल शब्द वापरुन रिल बनविल्याचे व ती रिल पोस्ट केल्याचे लक्षात आले. त्या रिलमध्ये परिक्षित हा मोपेडवर येतो. त्याचा मित्र समोरुन त्याला सांगतो की, हेल्मेट वेल्मेट घालत जा, समोर पोलिसवाले आहे ना, त्यावर परिक्षित हा अश्लिल शब्दाचा वापर करत असल्याचे दिसून आले. ती माहिती त्याने एका महिलेला दिली. त्या महिलेने तत्काळ दखल घेत गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले.
दोघांनी इन्स्टावर एक व्हिडियो पोस्ट करुन पोलिसांची प्रतिमा मलिन व्हावी व समाजामध्ये पोलिसांप्रती आदर कमी व्हावा अशा अश्लिल भाषेचा वापर केला, अशी तक्रार प्राप्त झाली. त्याआधारे दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
- गजानन गुल्हाने, ठाणेदार, गाडगेनगर