लघु प्रकल्पात अत्यल्प जलसाठा, आठवड्यात १० दलघमीने घट
By admin | Published: April 23, 2016 11:57 PM2016-04-23T23:57:54+5:302016-04-23T23:57:54+5:30
जून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे.
प्रदीप भाकरे अमरावती
जून ते सप्टेंबर १५ दरम्यान जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा फटका जलप्रकल्पांना बसला आहे. तूर्तास जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पात महिनाभर पुरेल इतका जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ७५ लघु प्रकल्पांची प्रकल्पीय जलक्षमता १६७.४६ दलघमी असताना २१ एप्रिल अखेर या प्रकल्पात केवळ ३०.८३ दलघमी (१८.४१ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. दर आठवड्याला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात सरासरी ७ ते १० दशलक्ष घनमीटरची घसरण होत आहे.
संपूर्ण जिल्हा दुष्काळात होरपळत असताना अनेक भागात पाणी टंचाईची धग जाणवत आहे. नदीनाले व विहिरी सुकू लागल्या आहेत. याशिवाय भूजल पातळीत कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात २१ एप्रिलअखेर सरासरी २४४.५७ दलघमी (२७.३९ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. २०१५ साली एप्रिल महिन्यात हाच जलसाठा ३५२.६५ दलघमी होता. तर २०१४ साली ३८६.४९ दलघमी असा उच्चांकी होता. मागील ७ दिवसात जिल्ह्यातील ८० प्रकल्पांमधील जलसाठ्यात सरासरी ११ दशलक्ष घनमीटरने घसरण झाली आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असताना पेयजलाच्या मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ८० सिंचन प्रकल्पाची एकूण प्रकल्पीय क्षमता ८९२.७७ दलघमी असताना तुर्तास या प्रकल्पात २४४.५७ दलघमी पाणी शिल्लक आहे.
मेळघाट भागात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. चिखलदऱ्यातील खडीमल, पाचडोंगरी, कोयलारी, मोथाखेडा, आवागड, तारूबांदा, कुलंगणा, भार्द्रा, ढोमणबढी, कालापाणी, पस्तलाई येथे टँकरने पेयजलाचा पुरवठा केला जात आहे. एप्रिलअखेर त्यात मोठी वाढ होणार आहे. याशिवाय वरुड व अन्य काही तालुक्यातील गावांमध्ये पेयजलाचे संकट उद्भवले आहे. (प्रतिनिधी)
पूर्णा प्रकल्पात लघुत्तम साठा
जिल्ह्यासाठी वरददायिनी ठरलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पात २१ एप्रिलअखेर १४७.९१ दलघमी (२६.२२ टक्के) जलसाठा शिल्लक आहे. शहानूरमध्ये २१.१८ दलघमी (४६ टक्के), चंद्रभागा मध्यम प्रकल्पामध्ये १६.८३ दलघमी (४०.८० टक्के), पूर्णा प्रकल्पात ९.१० दलघमी (२५.७३ टक्के) व सपन प्रकल्पात १८.७२ अर्थात ४८.५० टक्के जलसाठा आहे.