४२८ कोटींच्या कर्जातून १४६९३ बचत गटांनी उभारले लघुउद्योग
By जितेंद्र दखने | Published: June 26, 2024 08:33 PM2024-06-26T20:33:13+5:302024-06-26T20:33:25+5:30
डीआरडीए, महिला आर्थिक सक्षम बनविण्याचा प्रयन्न
अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन विभागाच्या वतीने महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी त्यांच्या लघुउद्योगांना प्राधान्य देत जिल्ह्यात १४ हजार ६९३ महिला बचत गटांना ४२८ कोटी ८३ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. या कर्जातून त्यांनी लघुउद्योगांची स्थापना केली. १५ बँकांनी या बचत गटांना कर्जाचा पुरवठा केला आहे.
एका महिलेला आर्थिक सक्षम केले तर एक परिवार सक्षम होतो. या धारणेतून शासनाच्या वतीने कर्जाची शिफारस केली जाते. त्यानंतर बँकांच्या वतीने या बचत गटांना कर्जाचे वितरण केले जाते. अशातच जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत, २ खासगी व १ ग्रामीण बँकेमार्फत १४ हजार ६९३ महिला बचत गटांना ४२८ कोटी ८३ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या कर्जातून महिलांनी लघुउद्योग सक्षम केले आहे. परिणामी जिल्ह्यात २१ हजार ४०० महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. या बचत गटांचे घरगुती साहित्यांसह विविध स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल तालुका व जिल्हास्तरावर झळकत आहेत. दरवर्षी जिल्हा व विभाग स्तरावर बचत गटांचे स्टॉल लावले जातात. विशेष म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी देखील या विभागामार्फत प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हा समन्वयक नीलेश मेश्राम यांनी दिली आहे.
महिलांना आर्थिक सक्षम बनवणे हा हेतू
महिलांना आर्थिक सक्षम करून त्यांना महिला उद्योजक बनवण्याचा मानस आहे. बचत गटांना कर्जच देत नाही तर त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देत आहोत. मेळघाटातील वस्तूंना महिला बचत गटांची स्थापना करून या माध्यमातून त्यांना आर्थिक सक्षम करण्याची योजना सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत चालणाऱ्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाकडून महिला बचत गटांना लघुउद्योगांकरिता ब्रँड बनवत मेळघाट हाट तयार केला आहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी दिली.