४५० एकर परिसरात ‘स्मार्ट सिटी’
By admin | Published: December 2, 2015 12:06 AM2015-12-02T00:06:34+5:302015-12-02T00:06:34+5:30
शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर राज्याला हेवा वाटेल अशी स्मार्ट सिटी महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात साकारली जाणार आहे.
महादेव खोरी, छत्री तलाव जागा निश्चित : महापौर, आमदार, आयुक्तांनी केली जागेची पाहणी
अमरावती : शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर राज्याला हेवा वाटेल अशी स्मार्ट सिटी महादेव खोरी, छत्रीतलाव परिसरात साकारली जाणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी महापौर चरणजित कौर नंदा, आमदार रवी राणा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदींनी जागेची पाहणी करुन या निसर्गरम्य भागात ‘स्मार्ट सिटी’ उभारण्याबाबत एकमत दर्शविले. ही जागा महसूल विभागाची असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रश्नच राहणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
‘स्मार्ट सिटी’बाबतचा विकास आराखडा १५ डिसेंबरपर्यत शासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे शहराच्या कोणत्या भागात ‘स्मार्ट सिटी’ साकारावी, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता महादेव खोरी व छत्रीतलाव परिसरात स्मार्ट सिटी साकारणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महादेव खोरी परिसरात गौरक्षण संस्थानची २५६ एकर तर छत्रीतलाव परिसरातील जागा अशा एकूण ४५० एकर जागेवर ‘स्मार्ट सिटी’ साकारणे शक्य आहे. महादेव खोरी, छत्रीतलाव परिसर निसर्गरम्य असून आंध्रप्रदेशातील अमरावती शहराप्रमाणे हे शहरसुध्दा ‘हायटेक’ होईल, असे आयुक्त गुडेवार म्हणाले. जागेची पाहणी केल्यानंतर महापौर चरणजित कौर नंदा यांच्या निवासस्थानी आ. रवी राणा, आयुक्त गुडेवार यांनी ‘स्मार्ट सिटी’ संदर्भात चर्चा केली. ज्या भागाची पाहणी केली या भागात ‘स्मार्ट सिटी’ साकारणे सुकर असल्याचे सर्वांनी मान्य केले.
मुख्यमंत्र्यांना जागेच्या पाहणीसाठी आणू
महादेव खोरी व छत्रीतलाव परिसर निसर्गरम्य असून या भागात ‘स्मार्ट सिटी’ साकारली जात असल्याची बाब शहरवासींयासाठी आनंददायी आहे. येथील बहुतांश जागा ‘ई- क्लास’ची आहे. त्यामुळे जागेचा गुंता सुटेल, यात शंका नाही, असे आ. रवी राणा म्हणाले. त्यामुळेच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या जागेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणू ,असा शब्द देखील आ. रवि राणा यांनी दिला. यामुळे आता स्मार्ट सिटी साकारण्याच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याचे संकेत आहेत.