‘स्मार्ट सिटी’त का माघारलो? चिंतन करा

By admin | Published: April 22, 2016 11:59 PM2016-04-22T23:59:20+5:302016-04-22T23:59:20+5:30

शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही.

'Smart City' to be abandoned? Contemplate | ‘स्मार्ट सिटी’त का माघारलो? चिंतन करा

‘स्मार्ट सिटी’त का माघारलो? चिंतन करा

Next

सुनील देशमुखांचा सल्ला : फास्ट ट्रॅकमध्ये समावेश नाही
अमरावती : शहराचा ‘स्मार्ट सिटी’मध्ये समावेश करण्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, केंद्र सरकारच्या निवड यादीत शहराचे नाव रँकिंगमध्ये ६४ व्या क्रमांकावर असून ‘फास्ट ट्रॅक’ यादीत स्थानच मिळाले नाही. ही बाब अमरावतीसाठी नुकसानदायक असून ‘स्मार्ट सिटी’त माघारण्याच्या कारणांवर चिंतन करण्याचा सल्ला आ. सुनील देशमुख यांनी दिला. तसेच महापालिका प्रशासनाचा एककल्ली कारभार संबोधून त्यांनी यावर ताशेरे ओढले. ‘स्मार्ट सिटी’त शहर माघारण्याच्या कारणांवरुन ते ‘लोकमत’शी बोलत होते.
आ. देशमुख यांच्या मते, जानेवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारने देशातील ९७ शहरांपैकी पहिल्या टप्प्यात २० शहरांची ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात निवड केली आहे. यात राज्यातील पुणे, सोलापूर शहरांचा समावेश आहे. अमरावतीचे नाव ‘स्मार्ट सिटी’त सहभागी व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रयत्न केलेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. हा उपक्रम राबविताना प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेतल्याने ही स्थिती उदभवली आहे. या उपक्रमात शहराचा समावेश न झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. ‘स्मार्ट सिटी’ उपक्रम अल्प शहरांसाठी होता. यासाठी प्रस्ताव तयार करताना लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, आदींना सोबत घेऊन काम केले असते तर वेगवेगळे अनुभव कामी आले असते. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी एककल्ली कारभार करून प्रस्ताव सादर केल्यानेच या प्रस्तावाला ४७.५७ गुणांक मिळाले, असा आरोपही देशमुखांनी केला. ‘स्मार्ट सिटी’चा एवढा गाजावाजा केला असतानाही पहिल्या यादीत नाव का आले नाही? अन्य शहरांच्या तुलनेत आपण का माघारलो?, याचे चिंतन झाले पाहिजे. अमरावतीकरांना ‘स्मार्ट सिटी’बाबत नेमके काय झाले, हे कळले पाहिजे. पहिल्या यादीत नाव नसले तरी अगदी काठावर काही गुणांनी माघारलेल्या २३ शहरांचा ‘फास्ट ट्रॅक’ यादीत समावेश करण्यात आला आहे. या ‘फास्ट ट्रॅक’ यादीतसुद्धा अमरावतीचे नाव नसल्याबाबत आ. देशमुखांनी आश्चर्य व्यक्त केले.
आ.देशमुखांच्या मते अद्यापही काही बिघडले नाही. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी सर्वसमावेशक विचार करून ‘स्मार्ट सिटी’करिता नव्याने प्रस्ताव तयार करताना एकट्याने रथ ओढण्याऐवजी सर्वांना सोबत घेतले पाहिजे. म्हणजे किमान दुसऱ्या टप्प्यात तरी अमरावतीचे नाव यायला हवे. याकरिता काही बाबी लपवून न ठेवल्या तर बरे होईल, असा सूचक सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारने नेमलेल्या एजन्सीमार्फतच डीपीआर तयार करणे अपेक्षित आहे. मात्र, आयुक्तांनी नियम गुंडाळून एजन्सी नेमण्याचा प्रताप केल्याचेही ते म्हणाले. विकासकामे करायचे असतील तर सर्वांना सोबत घ्यावे लागेल. अन्यथा अपयश पदरी पडते. नेमके हेच ‘स्मार्ट सिटी’बाबत झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचे नाव आणण्याची आणखी एक संधी आहे अन्यथा ‘स्मार्ट सिटी’पासून अमरावतीकरांना वंचित रहावे लागेल, असेही आ.देशमुख म्हणाले. आयुक्तांनी ‘स्मार्ट सिटी’त जे काही केले ते आपल्या मर्जीनुसार केले आहे. (प्रतिनिधी)

‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’- सुनील देशमुख
अमरावती शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत झळकणार, असा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘स्मार्ट सिटी’साठी मी अमूक केले, तमूक केले, अशी बतावणी करून महापालिका आयुक्तांनी शहरवासीयांची दिशाभूल केली. त्यामुळे यादीत नाव का आले नाही, काय चुकले? हे जनतेला कळले पाहिजे. ‘ताली कप्तान को, तो गाली भी कप्तान को’ या म्हणीनुसार आयुक्तांनी अपयशदेखील स्वीकारले पाहिजे, असा प्रहारही आ. सुनील देशमुख यांनी केला.

२० शहरांची 'स्मार्ट सिटी'त निवड
केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात पहिल्या टप्प्यात देशातील २० शहरांची निवड केली आहे. यात भुवनेश्वर, पुणे, जयपूर, सुरत, कोची, अहमदाबाद, जबलपूर, विशाखापट्टणम्, सोलापूर, देवनगरी, इंदूर, कोर्इंबतूर, काकिनाडा, बेलगावी, उदयपूर, गुवाहाटी, चेन्नई, लुधियाना, भोपाळ, दिल्ली या शहरांचा समावेश आहे.

‘फास्ट ट्रॅक’मध्ये
समाविष्ट शहरे
४वारंगल, चंदीगड, लखनऊ, न्यू कोलकाता, पणजी, पासीघाट, धर्मशाळा, फरिदाबाद, रायपूर, दीव, भावनगर, शिलाँग, नामची, पोर्ट ब्लेअर, ओलग्रेट, सिल्व्हासा, इंफाल, रांची, अगरतला, कोहिमा, ऐझवल, कर्वटी, देहरादूनचा समावेश आहे.

Web Title: 'Smart City' to be abandoned? Contemplate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.