बडनेरा परिसरातच साकारावे ‘स्मार्ट सिटी’
By admin | Published: December 3, 2015 12:26 AM2015-12-03T00:26:28+5:302015-12-03T00:26:28+5:30
बडनेरा परिसरातील शेतकरी हे ‘स्मार्ट सिटी’ साकारण्यासाठी जमिन देण्यास तयार असून याच अविकसीत भागात हा प्रकल्प साकारण्यात यावा,
शेतकऱ्यांची मागणी : अविकसित भागाचा विकास करा, गौरक्षणच्या जमिनीवर प्रकल्प साकारु नका
अमरावती : बडनेरा परिसरातील शेतकरी हे ‘स्मार्ट सिटी’ साकारण्यासाठी जमिन देण्यास तयार असून याच अविकसीत भागात हा प्रकल्प साकारण्यात यावा, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. जमिनीला बाजार मुल्यानुसार दर मिळत असेल तर कोणाचीही हरकत नाही. त्यामुळे बडनेरा परिसरातच ‘स्मार्ट सिटी’ साकारावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीे.
आयुक्तांच्या दालनानजिक असलेल्या सभागृहात बडनेरा परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची भेट घेवून ‘स्मार्ट सिटी’साठी जमिन देण्याबाबत असलेला गुंता स्पष्ट केला. या शेतकऱ्यांचे नेतृत्व भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी केले. यावेळी संपूर्ण शेतकऱ्यांनी जमिनीच्या दराबाबत प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आले नाही. यापूर्वी रेल्वे वॅगन प्रकल्प, विमानतळ, टाकळी कलान या प्रकल्पांसाठी कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्यात. मात्र ‘स्मार्ट सिटी’ साकारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी या बाजारमुल्यानुसार घेत असल्याचे प्रशासनाने उशिरा कळविले, ही बाब शेतकऱ्यांनी आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. यावेळी शिवराय कुळकर्णी यांनी ‘स्मार्ट सिटी’ साकारण्यासाठी एकाही शेतकऱ्यांचा नकार नाही. त्यामुळे गौरक्षण संस्थानला ज्या वापरासाठी जमिन दिली, त्याच हेतूसाठी वापर व्हावा, असे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या मनात काही विरोध होता, पण हा विरोध आता मावळला आहे. परिणामी प्रशासनाने शेतकऱ्यांचे हित जोपासावे, असे कुळकर्णी यांनी आयुक्तांना म्हणाले. याविषयी आ. सुनील देशमुखांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल. यावेळी शिवराय कुळकर्णी, किशोर अंबाडकर, सुनील शेरेवार,संजय दारोकार, निशिकांत पवार, सुदर्शन जैन, शाम संबे, विक्रांत इंगोले, विशाल इंगोले, तनवीर खान, रमेश इंगोले, सागर पवार, मयूर इंगोले, गोविंदराव भगत, किरण पेठकर, अनिकेत इंगोले आदी उपस्थित होते.