स्मार्ट जसापूरला १० लाखांचे पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:09 PM2019-01-28T23:09:22+5:302019-01-28T23:09:49+5:30
पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जसापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकासह दहा लाख रूपयांचे बक्षीस मिळविले. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते जसापूरच्या सरपंच आणि सचिवांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जसापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकासह दहा लाख रूपयांचे बक्षीस मिळविले. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते जसापूरच्या सरपंच आणि सचिवांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
प्रजासत्ताकदिनी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत जसापूरच्या सरपंच वनिता बेंडे, सचिव रूपाली कोंडे यांना सन्मानपत्र देण्यात आले. चांदूर बाजारपासून तीन किलोमीटर अंतरावरील जसापूर ग्रामपंचायतीने सर्व योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून दिला. घरोघरी शौचालय असल्याने गाव हागणदारीमुक्त झाले. गावाची वसुली शंभर टक्के होण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. ग्रामपंचायत पेपरलेस करण्यात आली.
बक्षिसांचा उपयोग ग्रामविकासासाठी
स्मार्ट ग्राम योजनेसाठी जसापूरवासीयांचे अमूल्य सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याशिवाय यश मिळणे अशक्य होते. हा सन्मान जसापूरवासीयांना समर्पित असून, मिळालेल्या बक्षिसांच्या रकमेचा उपयोग केवळ गाव विकासासाठी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ग्रामसचिव रुपाली कोंडे यांनी दिली. गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सिडाम, विस्तार अधिकारी (पंचायत) सातंगे यांच्या सहकार्याने जसापूर गाव प्रगतीपथाकडे जात आहे.