बँक प्रतिनिधीसाठी तीन हजार संस्थांमध्ये धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:14 AM2021-07-07T04:14:21+5:302021-07-07T04:14:21+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी १३ ऑगस्टला अंतिम मतदार यादी तयार होत आहे. त्याअनुषंगाने सभासद संस्थांचे ठराव ८ ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी १३ ऑगस्टला अंतिम मतदार यादी तयार होत आहे. त्याअनुषंगाने सभासद संस्थांचे ठराव ८ जुलैपर्यंत मागण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन हजार सोसायट्यांमध्ये सध्या धुमशान सुरू झालेली आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी होताच जिल्हा बँकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत सुरू झालेला आहे. यापूर्वी ११ मे रोजी या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा कार्यक्रम सुरू झाल्याने २१ संचालकांना मतदान करणारे प्रतिनिधींचे ठराव सभासद संस्थांकडून ८ जुलैच्या आत संबंधित सहायक निबंधकांकडे सादर करावे लागणार आहेत. हे बँक प्रतिनिधी सभासद संस्थांच्या आमसभा किंवा संचालकांमधून निवडले जात आहेत. त्यामुळेच आता गावागावातील या संस्थांमध्ये राजकारण शिरले आहे.
जिल्हा बँकेचे निवडणूक अधिकारी तथा प्रभारी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी २४ जून ते ८ जुलैदरम्यान हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे सहकारातील राजकारणाने पुन्हा वेग घेतला आहे. आपल्याच गटाचा प्रतिनिधी राहावा यासाठी दबावतंत्राचा वापरदेखील सुरू झालेला आहे. काही सोसायट्यांमध्ये बँक प्रतिनिधीसाठी निवडणूक देखील झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सभासद संस्थांचे ठराव आता एआर कार्यालयाकडे जमा होत आहेत. १६ तारखेला जिल्हा बँकेद्वारा प्रारूप मतदार यादी तयार होऊन २० जुलै रोजी प्रसिद्ध होईल. त्यापुढील दहा दिवसांत यावर आक्षेप विभागीय सहनिबंधकांकडे नोंदविण्यात येणार आहेत. यावर त्यांच्याद्वारे ९ ऑगस्टपर्यंत सुनावणी होऊन १३ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
बॉक्स
या २१ संचालक पदांसाठी निवडणूक
जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदांसाठी प्राथमिक कृषी पुरवठा, सेवा सहकारी संस्था, आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या मतदारसंघांतून १४ प्रतिनिधी निवडल्या जातील. प्रत्येक तालुक्यामधून एक प्रतिनिधी निवडल्या जाणार आहे. याशिवाय अनु. जाती किंवा जमाती, ओबीसी व विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग, वैयक्तिक भागधारक संस्था तसेच इतर सहकारी संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी व दोन महिला असे संचालक मंडळ राहील.
बॉक्स
या आहेत वैयक्तिक भागधारक, इतर संस्था
जिल्ह्यातील इतर शेती संस्था, कृषी पणन संस्था यामध्ये दुग्ध संस्था, पशुपैदास संस्था, वराहपालन संस्था, कुक्कुटपालन संस्था, शेळी-मेंढी पालन संस्था, पाणी पुरवठा संस्था, शेंग उत्पादन संस्था, कृषी पणन संस्था, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने, ऑइल मिल, सूतगिरणी, बीज प्रक्रिया नागरी सहकारी बँका, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, पगारदार पतसंस्था, ग्राहक सहकारी संस्था, औद्योगिक विणकर, बारा बलुतेदार संस्था, मजूर कामगार ठेकेदारी संस्था, सहकारी छापखाने आदी.