एसएमएस कंपनीचे दूषित पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:39+5:302021-06-18T04:09:39+5:30
फोटो पी १७ नांदगाव पेठ नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये ...
फोटो पी १७ नांदगाव पेठ
नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये शिरले आहे. यामुळे नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रवाहाने हे दूषित पाणी वाहत आता बोर नदी प्रकल्पात जात असून, भविष्यात परिसरातील शेती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.
नजीकच्या आस्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या कालव्यात या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्याचे थर साचलेले आहे. हे पाणी पावसाच्या प्रवाहाने जलस्रोतांमध्ये शिरत आहे. शिवाय नदीच्या कालव्यातून हे पाणी नव्याने बनलेल्या बोरनदी प्रकल्पातदेखील शिरत असल्यामुळे आजूबाजूची शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होणार आहे. एसएमएस कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतीत हे केमिकलयुक्त पाणी शिरल्याने येथील संत्रीच्या बागा व शेतातील उत्पादन कायमचे बंद झाले आहे. नुकतेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर बाधित झालेली शेती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. या कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपनीने आजवर कोणतीच दाखल घेतलेली नसून, हे दूषित पाणी बघण्यासाठी नुकतेच ग्रामपंचायत सदस्य बाळू राऊत, छत्रपती पटके, गोलू नागापुरे व मोरेश्वर इंगळे यांनी मोका पाहणी करून कंपनीवर कारवाईची मागणी केली.