तस्करांनी पोखरले वर्धा नदीचे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:24+5:30
बोरगाव धांदे या बैलबाजार परिसरातून तसेच रायपूर, कासारखेडा, विटाळा येथील ई-क्लास परिसरातून दररोज रात्रीला रेती तस्करी केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंडळ अधिकारी देविदास उगले यांच्या पथकाने या भागात एक कारवाई केली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांची रात्रीला या भागात गस्त घातली जाते. मात्र, रेतीतस्कर पोलिसांना हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती-धामणगाव रेल्वे : अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीतील जोडरस्ता रेती तस्करांनी पोखरल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव व आर्वी तालुक्यातील वडगाव पांडे या गावांचा दैनंदिन संपर्क तुटला आहे. रेती तस्करांनी नदीत मोठे खड्डे केले आहेत.
मंगरूळ दस्तगीरनजीकच्या नायगाव व वडगाव येथील शेतकरी व गावकऱ्यांसाठी नदीपात्रातून जोड रस्ता होता. वडगाव घाट क्रमांक १ मधून अवैध वाळू उपसा करण्यासाठी नदीपात्रातील हा जोड रस्ता तस्करांनी उखडला. यासंदर्भात हटकले असता, वाळू माफियांकडून दमदाटी केली जाते, अशी तक्रार आहे. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची नदीच्या अल्याड-पल्याड शेती आहे. जोडरस्त्यामुळे तेथपर्यंत पोहोचणे सोपे होते. मात्र, घाटाचे लिलाव घेणाऱ्यांनी नदीपात्रातील वाळूच्या वारेमाप उपसा करून मोठे खड्डे करून ठेवले.
पथक दाखल होत असल्याची टीप
धामणगाव तालुक्यातील नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव धांदे, आष्टा, चिंचोली, गोकुळसरा, सोनोरा काकडे, रायपूर, कासारखेडा ही गावे वर्धा नदीच्या काठी येतात. नदीतून दररोज रात्रीला रेतीचे उत्खनन केल जाते. रात्री २ पासून खुलेआम रेती काढली जाते. महसूल प्रशासनाची नेमलेले पथक कारवाईसाठी दाखल होताच टिप मिळते. त्यामुळे रेती तस्कर ट्रक घेऊन पसार होतो.
कोटींची रेती बेपत्ता, कारवाई शून्य
बोरगाव धांदे या बैलबाजार परिसरातून तसेच रायपूर, कासारखेडा, विटाळा येथील ई-क्लास परिसरातून दररोज रात्रीला रेती तस्करी केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंडळ अधिकारी देविदास उगले यांच्या पथकाने या भागात एक कारवाई केली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांची रात्रीला या भागात गस्त घातली जाते. मात्र, रेतीतस्कर पोलिसांना हुलकावणी देत असल्याचे चित्र आहे.
रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले आहे. या भरारी पथकाचे आता क्रॉस पद्धतीने रेतीघाटावर नजर राहणार आहे. रेती तस्करांना मदत करणारा एखादा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- भगवान कांबळे,
तहसीलदार, धामणगाव रेल्वे
मागील दीड वर्षांपासून रेतीची चोरी सर्रास सुरू आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही या गंभीर बाबी प्रशासन लक्ष देत नाही आणि याची दखल घेत नाही. प्रशासनाच्या सहकार्याने ही रेतीचोरी होत असून, या गंभीर बाबीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
- प्रशांत बायस्कर,
ग्रामस्थ, पेठ रघुनाथपूर