रेशनच्या १५ लाखांच्या तांदळाची तस्करी; ट्रकसह चालक, क्लिनर ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:04 AM2023-08-29T11:04:36+5:302023-08-29T11:06:03+5:30
सीआययूची कारवाई
अमरावती : शासकीय धान्य चिल्लर स्वरूपात खरेदी करून ते तांदूळ अधिक भावात विक्रीकरिता घेऊन जात असलेल्या दोघांना पोलिस आयुक्तांच्या सीआययू पथकाने ताब्यात घेतले. २७ ऑगस्ट रोजी बडनेरा महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान १५ लाख २६ हजार २५० रुपये किमतीचा ३०० क्विंटल तांदूळ व ३० लाख रुपये किमतीचा १४ चाकी ट्रक जप्त करण्यात आला. चालक अमितसिंग घनश्यामसिंग निसाद (३८) व क्लिनर योगेश जिजोधन निसाद (१९, दोघेही रा. नांदघाट, बेमेतरा, छत्तीसगड) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
रेशनचा तांदूळ असलेला एक १४ चाकी ट्रक जळगावहून अकोलामार्गे बडनेरा हायवेने जात असल्याची माहिती सीआययूला मिळाली. त्याआधारे त्या ट्रकचा शोध घेतला तो मिळून आला. अमितसिंग व योगेश या चालक क्लिनरला विचारणा केली असता त्यांनी ट्रकमधील मालाबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, सोमवारी अन्न पुरवठा विभागाला ट्रक व त्यातील तांदळाची माहिती देण्यात आली. त्यावर तो तांदूळ शासनाचा असल्याचा अहवाल अन्न व पुरवठा विभागाने पोलिसांना दिला. त्यावरून दोघेही शासकीय धान्य चिल्लर स्वरूपात खरेदी करून, साठवणूक करून तो विनापरवाना अधिक भावात विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
यांनी केली कार्यवाही
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन युनिटचे प्रमुख तथा सहायक पोलिस निरिक्षक महेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमलू, पोलिस अंमलदार सुनील लासुरकर, जहीर शेख, विनय मोहोड आदींनी केली. यापूर्वी भातकुली येथून तांदळाचा मोठा साठा पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने जप्त केला होता.