मेळघाटातील नदी-नाल्यांमधून खुलेआम रेतीची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 11:16 PM2017-11-16T23:16:55+5:302017-11-16T23:17:33+5:30
मेळघाटातील नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर असून, दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर शहर व गावाकडे वाहतूक करताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील नदी-नाले रेती तस्करांच्या रडारवर असून, दररोज मध्यरात्री व भल्या पहाटे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर शहर व गावाकडे वाहतूक करताना दिसून येत आहेत. रेती लिलावाची मुदत संपली असली तरी नवीन हर्रासाची प्रक्रिया सुरू न झाल्याने तस्करांचे चांगलेच फावले आहे.
तालुक्यात तापी, गडगा, सिपना, खंडू, खापरा या प्रमुख नद्या व मोठ्या नाल्यात अल्प प्रमाणात रेतीसाठा उपलब्ध आहे. यापैकी दरवर्षी तापी नदीवरील दोन-तीन घाटांचीच लिलाव प्रक्रिया करण्यात येते. रेती तस्करांना इतर नदी-नाले आपल्या व्यवसायासाठी मोकळे सोडण्यात आले असल्यानेच गावाजवळून वाहणाºया नदी-नाल्यांवरून रेती, डब्बर सर्रास चोरण्याचा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघावयास मिळत आहे. यावर्षी पूर न आल्यामुळे रेतीचा साठा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. त्यांनाही रिकामे करण्याचा विडाच रेती तस्करांनी उचलला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार रात्री व भल्या पहाटे सुरू असल्याने याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पाणीटंचाईचा धोका!
तालुक्यातील धूळघाट येथील गडगा नदीवरील काठीयाघाट, सिपना नदीवरील उतावली, दिया तसेच इतर गावांजवळील नदी-नालेही रेती तस्करांनी साफ करणे सुरू केले आहे. याची वेळीच दखल घेतली नाही, तर भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
आमच्या विभागाकडून तात्काळ कार्यवाही केली जाते. तरीही चोरटे सक्रिय असल्यास त्यासाठी लवकरच भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येईल. प्रशासनाची रेती तस्करावर करडी नजर आहे.
- संगमेश कोडे,
तहसीलदार, धारणी.