संत्र्यांच्या आड सागवान तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:22 PM2018-01-14T23:22:04+5:302018-01-14T23:22:58+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत्रा लाकडाच्या नावे मेळघाटातून सागवानची तस्करी होत आहे. मध्यप्रदेशच्या सीमेतून बहिरम, परतवाडा, ब्राम्हणवाडा गोंविदपूर, चांदूरबाजारमार्गे अमरावतीत चोरीचे सागवान आणले जात आहे. वलगाव मार्गालगतच्या जमील कॉलनीत सागवान तस्करीचे लाकूड साठविले जात असून परतवाडा, घाटलाडकी व अमरावती, असे सागवान चोरीचे कनेक्शन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सागवान चोरीसाठी तस्करांनी वेगळी शक्कल लढविली असून, ते वाहनात संत्रापेटी, तणस किंवा लाकूड आणण्याचा देखावा करतात. परंतु, वाहनाच्या आतमध्ये मेळघाटातून चोरट्या मार्गाने आणलेले सागवान लाकडाच्या चौकटी राहतात. सागवान तस्करीत काही वनाधिकारीदेखील सामील आहेत. मात्र, सागवान तस्करांसोबत विशिष्ट वनाधिकाºयांचे मधुर संबंध असल्याने गत काही वर्षांपासून सागवान तस्करीचा प्रवास अविरतपणे सुरू असल्याची माहिती आहे. मेळघाटातून चोरट्या मार्गाने आणले जाणारे सागवान लाकूड अमरावती येथील काही आरागिरण्यांमध्ये पोहोचविले जाते.
वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष
हा व्यवहार रात्रीलाच होत असल्याचे सांगण्यात आले. ३ ते ५ फू ट आकाराची सागवान चौकट बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत असल्याने बहुतांश आरागिरणी संचालक जमील कॉलनी येथून खरेदी करतात. चोरीचे सागवान लाकूड हे नियमानुसार आणले असल्याचे दाखविण्यासाठी परवाना असलेल्या सागवान लाकडात ते रूपातंरित करतात. रात्री आणि सकाळच्या सुमारास चोरीचे सागवान चौकटीचा व्यवहार होत असल्याने शहरातील आरागिरण्यांमध्ये सारे काही आॅलवेल असल्याचा देखावा सुरू आहे. मेळघाटातून जमील कॉलनीत निरंकुशपणे चोरीचे सागवान लाकूड आणले जात असताना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
जमील कॉलनीत उत्तरेकडील गोदाम कुणाचे?
स्थानिक जमील कॉलनीत सागवान तस्करीचे लाकूड साठवून ठेवण्यासाठी मोठे गोदाम निर्माण करण्यात आले आहे. विशिष्ट समुदायाचे हे गोदाम उत्तरेकडील भागात आहे. विनापरवाना लाकूडसाठा येथे येथे करण्यात आला आहे. मात्र, या गोदामाची तपासणी वनविभाग किंवा पोलीस प्रशासनाने केली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
मेळघाटातून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील आरागिरण्यांची तपासणी केली जाईल. गोदामांची शोधमोहीम राबविताना नियमबाह्य लाकूड आढळल्यास कायदेशीर कारवाई करू.
- हेमंत मीणा,
उपवनसंरक्षक, अमरावती