रेती, गौण खनिजांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:32 AM2019-04-05T01:32:24+5:302019-04-05T01:32:53+5:30
सध्या लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज लावून दिले आहे. त्याचा फायदा घेत तालुक्यात रेती व गौण खनिजांचे तस्कर सक्रिय झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : सध्या लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज लावून दिले आहे. त्याचा फायदा घेत तालुक्यात रेती व गौण खनिजांचे तस्कर सक्रिय झाले आहेत.
तिवसा महसूल विभागांतर्गत एकही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. तिवसा हद्दीवर वर्धा नदी आहे. पात्रात रेती आहे. या शासकीय महसुलाला संबंधित अधिकारी व कर्मचारीच सुरुंग लावत असल्याचे समोर येत आहे. जावरा, फत्तेपूर, तळेगाव ठाकूर, पिंगळाई नदी, सूर्यगंगा नदीपात्र व नाल्यातील रेतीची तस्करी होत आहे. गौण खनिजाचीही विनारॉयल्टी वाहतूक होत आहे. या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पाऊल उचलले नाही, उलट चिरीमिरी घेऊन या अवैध वाहतुकीला रान मोकळं केलं जात आहे.
नगरपंचायत अंतर्गत शहरात विकासकामे सुरू आहेत. रेतीघाट बंद असूनही या बांधकामावर चोरीची रेती येत आहे. या चोरीच्या रेतीवर बांधकाम होत असल्याने त्याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कौंडण्यपूर येथील नदीपात्रात रेतीमाफियांनी डोंगे लावले असून, या नदीपात्रातून रेतीचा उपसा दिवसाढवळ्या सुरू आहे. नदीपात्रातून रेती काढून ही काठावर आणल्यानंतर ट्रक व ट्रॅक्टरच्या साहाय्याने विकली जात आहे.