शिवशाही बसमधून चांदीच्या दागिन्यांची तस्करी?, एका लगेजसाठी तीन ठिकाणांहून बसले प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 02:34 PM2021-01-02T14:34:15+5:302021-01-02T14:43:13+5:30
Amravati News : गुन्हे शाखेने प्राथमिक तपासणी करून बस फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणली.
अमरावती : पुण्याहून निघालेल्या शिवशाही बसमधील एका सीटवर ठराविक अंतराने प्रवासी बदलत होते. मात्र, लगेज अमरावतीहून बस निघाल्यानंतरही कायम होते. अखेर चालकानेच थेट पोलीस आयुक्तालयात बस आणली. तेथून ती फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नेण्यात आली. शनिवारी दुपारी या तीन बॅगमध्ये तस्करीची चांदी अथवा मोठे घबाड असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पुणे-नागपूर शिवशाही बस (एमएच ०९ ईएम १२९३) ने चालक मुकेश हुकरे (रा. चंदननगर, नागपूर) व वाहन मोहन पडोळे (रा. नागपूर) हे परतीच्या मार्गावर होते. या बसमध्ये पुण्याहून एक बॉक्स व दोन बॅग असे लगेज घेऊन एक व्यक्ती बसला. तो अकोल्याला उतरला तरी त्याने लगेज सोबत नेले नाही. त्याच सीटवर तेथून अमरावतीकरिता एक व्यक्ती बसला. त्यानेही ते लगेज जैसे थे ठेवले. अमरावतीहून त्याच सीटवर आणखी एक युवक नागपूरकरिता बसला.
चालकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नागपूर मार्गाहून बस थांबवून त्या सीलबंद लगेजची तपासणी केली आणि नजीकच्या पोलीस ठाण्याची माहिती नसल्याने थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयापुढे बस थांबविली. गुन्हे शाखेने प्राथमिक तपासणी करून बस फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आणली. तेथे लगेजसोबत असलेला प्रवासी पंकजसिंह सुधीरसिंह तोमर (२६, रा. ग्राम अनमोल, डोडोरी, ता. कोरसा, जि. मुरैना, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेतले. या प्रकरणाची पुढील चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, पोलीस निरीक्षक नितीन मगरे यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत. आबकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले असून, या लगेजमध्ये चांदीचे दागिने असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.