-अन् बसच्या स्टेअरिंगवर येऊन बसला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:05 AM2018-10-18T11:05:48+5:302018-10-18T11:08:05+5:30
नागपूरहून नांदगाव पेठकडे येणाऱ्या बसचालकाने रस्त्यावरील एका सापाला वाचविले अन् बस पुढे नेली, मात्र, काही अंतराच्या प्रवासानंतर तोच साप अचानक बसच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचल्याचे पाहून चालकांची भंबेरीच उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नागपूरहून नांदगाव पेठकडे येणाऱ्या बसचालकाने रस्त्यावरील एका सापाला वाचविले अन् बस पुढे नेली, मात्र, काही अंतराच्या प्रवासानंतर तोच साप अचानक बसच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचल्याचे पाहून चालकांची भंबेरीच उडाली. रविवारी हा प्रकार नांदगाव पेठ बसस्थानकावर उघड होताच सर्पमित्रांच्या मदतीने सापाला पकडण्यात आले.
नागपूरहून बसप्रवाशांना घेऊन एक एसटी क्रमांक एमएच २७-५७०३ ही अमरावतीकडे येत होती. बस नांदगाव पेठ बसस्थानकावर पोहोचली. तेव्हा साप रस्ता ओलांडत होता. त्यामुळे बसचालक चेतन ढाकुलकर (चांदुररेल्वे) यांनी सापाला वाचवून आपला पुढील प्रवास सुरू ठेवला. मात्र, दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास मोझरीवरून बस नांदगाव पेठ स्थानकावर पोहोचणार तेच बस चालकाची नजर स्टेअरींगजवळ गेली आणि त्यांची भंबेरीच उडाली. स्टेअरिंगजवळ पोपटी रंगाचा साप पाहून चालकांची बोलतीच बंद झाली. मात्र, एसटीतील प्रवाशांचा विचार करून त्यांनी स्टेअरिंंगवर ताबा घेऊन कशीबशी एसटी नांदगाव पेठ स्थानकात नेली. साप असल्याच्या माहितीवरून बसप्रवाशांची तारांबळ उडाली. प्रशासनाकडून या प्रकाराची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र अभिजित दाणी यांनी ती माहिती त्यांचे सहकारी रक्षक वन्यजीव सरंक्षण संस्थेचे ठकसेन इंगोले व अक्षय चंबतकर यांना दिली. त्याच्या माहितीवरून सर्पमित्र जय पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला जिवंत पकडले. त्यावेळी बस चालकास व प्रवाशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्पमित्रांनी सापाचे निरीक्षण केले असता, तो दुर्मिळ हरणटोळ प्रजातीचा साप असल्याचे निदर्शनास आले.