सोनसाखळीचोरांना रोखले अन् ते गतप्राण झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 11:05 PM2018-07-03T23:05:17+5:302018-07-03T23:06:29+5:30

सोनसाखळी चोर येतात... एका महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून नेतात... ती ओरडते... काही अंतरावर असलेल्या एका गृहस्थाला हे लक्षात येते... झटदिशी ते गृहस्थ चोरांच्या दिशेने झेपावतात... चोर दुचाकीवरून पडतात... चोर बचावासाठी त्या गृहस्थाच्या दिशेने चाकू रोखतात अन् त्या गृहस्थाला हृदयविकाराचा झटका येतो. ते जागीच गतप्राण होतात... चित्रपटात शोभावी, अशी ही गूढ घटना येथील चुनाभट्टीजवळील अंबादेवी रोडवर मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली.

Snoopers blocked and they collapsed! | सोनसाखळीचोरांना रोखले अन् ते गतप्राण झाले!

सोनसाखळीचोरांना रोखले अन् ते गतप्राण झाले!

googlenewsNext
ठळक मुद्देअंबादेवी नाल्यावरील घटना : आरोपींनी रोखला चाकू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोनसाखळी चोर येतात... एका महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून नेतात... ती ओरडते... काही अंतरावर असलेल्या एका गृहस्थाला हे लक्षात येते... झटदिशी ते गृहस्थ चोरांच्या दिशेने झेपावतात... चोर दुचाकीवरून पडतात... चोर बचावासाठी त्या गृहस्थाच्या दिशेने चाकू रोखतात अन् त्या गृहस्थाला हृदयविकाराचा झटका येतो. ते जागीच गतप्राण होतात... चित्रपटात शोभावी, अशी ही गूढ घटना येथील चुनाभट्टीजवळील अंबादेवी रोडवर मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. या घटनेची मोठी चर्चा त्या परिसरात आहे. पोलिसांचे मात्र याविषयी मत भिन्न आहे.
नमुना गल्ली क्रमांक ४ येथील संध्या विजय शिंदे (५०) मंगळवारी सकाळी ६ वाजता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाजवळील गौरक्षणात दूध घेण्यासाठी गेल्या. परत येताना अंबा नाल्याच्या पुलावर रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्याच्या गळ्यावर हात टाकून १२ ग्र्र्र्र्रॅमची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.
चोरट्यांनी उगारला चाकू
नाल्याजवळील ओट्यावर बसलेल्या प्रभाकर गोधनकर (५५, रा. नमुना) यांनी चोरांच्या दिशेने धाव घेतली. काही अंतरावर चोरट्यांची दुचाकी प्रभाकर गोधनकर यांनी रोखून घेतली असता, चोरांची दुचाकी घसरून खाली कोसळली. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरांनी कमरेतील चाकू काढून प्रभाकर गोधनकर यांच्या दिशेने रोखला. चोरांनी त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच गोधनकर यांनी चोरांपासून सावध होण्याचा प्रयत्न केला. मात्र, धावत गेल्याने वयोवृद्ध प्रभाकर गोधनकर यांना धाप लागली. त्यातच चोरांनी चाकू उगारल्याचा धसका घेतल्याने प्रभाकर गोधनकर यांच्या छातीत तीव्र वेदना झाल्या. ते खाली कोसळले.
यादरम्यान संध्या शिंदे यांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. नमुना परिसरातील काही नागरिक व गोधनकर कुटुंबातील सदस्यदेखील घटनास्थळी धावून गेले. या कालावधीत चोरट्यांनीही पळ काढला.
कुटुंबीयांनी तत्काळ प्रभाकर गोधनकर यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सोनसाखळी चोरीच्या घटनेची तक्रार संध्या शिंदे यांनी राजापेठ पोलिसांकडे केली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भादंविच्या कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
मंगळसूत्र हिसकले; महिला जखमी
मंगळसूत्र हिसकावण्यात आल्यानंतर महिला खाली कोसळून जखमी झाल्याची घटना २४ जुलै रोजी हरिओम कॉलनीत घडली. या प्रकरणात हरिहर केशव केने यांनी मंगळवारी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी मंंगळसूत्र हिसकण्याचा प्रयत्न केला असता, ती महिला खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या महिलेस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे तक्रार उशिरा नोंदविण्यात आली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.
दुचाकी क्रमांकाची प्लेट वाकलेली
सोनसाखळीचोरांच्या दुचाकीवरील क्रमांकाची प्लेट वाकलेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींच्या निदर्शनास आले. त्यावर २४ असा क्रमांक काही जणांनी पाहिल्याचे स्थानिक रहिवासी सांगत होते.
घटनास्थळावर सापडला एका चोराचा बूट
सोनसाखळी चोरून पळणाऱ्यांना पकडण्यासाठी प्रभाकर गोधनकर धावून गेले. त्यांना चोराने गाडीवर बसूनच लाथा झाडल्या. यादरम्यान दुचाकीवर मागे बसलेल्या चोराचा बूट पायातून निघाला आणि दुचाकी घसरली. या घाईत चोराने एक बूट सोडून तेथून पलायन केले. घटनेच्या काही वेळानंतर राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना रस्त्यावर पडलेला बूट आढळून आला.

मंगळसूत्र हिसकाविल्यानंतर वळण रस्त्यावर चोरटे दुचाकीवरून पडले. त्याच वेळी नमुन्यातील एक गृहस्थ चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने पाहण्यासाठी धावत गेले अन् हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.
- किशोर सूर्यवंशी,
पोलीस निरीक्षक, राजापेठ.

Web Title: Snoopers blocked and they collapsed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.