ग्रामीणमध्ये आतापर्यंत २२ हजार ३२३ कोरोना संक्रमितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:34+5:302021-04-20T04:13:34+5:30
अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा ...
अमरावती; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक तीव्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असून बाधितांचा आतापर्यंतचा आकडा २२ हजार ३२३ वर पोहोचला आहे. यात ३५८ नागरिकांचा जीव कोरोनारूपी राक्षसाने घेतल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ग्रामीण भागात कोरोनासंबंधी नियमांचे पालन प्रभावीपणे होत नसल्याने बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उपलब्ध आकडेवारीनुसार अचलपूर तालुक्यात आतापर्यत सर्वाधिक ३६७१रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे. यातील ३३५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३५२ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ वरूड तालुक्यात २७८१ रुग्ण आढळून आले होते. त्यातील २२६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४४५ जण उपचार घेत आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८८० कोराेनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी १५४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३८ जण उपचार घेत आहेत. तिवसा तालुक्यात १८५८ कोरोना संक्रमित आढळून आले होते. यापैकी १६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २५ ८ जण उपचार घेत आहेत. मोशी तालुक्यात १६५७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी १४०९ रुग्ण बरे झाले आहेत. तर २९४ जण उपाचार घेत आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यात १४६६ रुग्ण आढळले आहेत. यातील ११०६ जण बरे झाले असून ३४९ जण उपचार घेत आहेत. अमरावती तालुक्यात १३९२ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ११२२ रुग्ण बरे झाले असून १३७ जण उपचार घेत आहेत. याशिवाय इतरही तालुक्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी अनेक जणांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ग्रामीण भागात ३५८ जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाल्याची नोंद आहे.
बॉक्स
नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक
प्रशासकीय स्तरावर जनजागृती करूनसुद्धा बहुतांश नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. परिणामी, बाधितांचा आकडा शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक वाढत असल्याचे पुढे आले येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वच तालुक्यांतील बहुतांश गावांत कोरोनाने शिरकाव केला आहे. सातत्याने अनेक गावांत रुग्ण आढळून येत आहेत. तरीही आतापर्यंत कोरोनाला जिल्ह्यातील अनेक गावांत प्रवेश करू दिला नसल्याची उदाहरणे आहेत.
कोट
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जात आहे. नागरिकांनी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.
डाॅ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी