- तर आई-बहिणींची सुरक्षितता धोक्यात होती
By admin | Published: April 22, 2017 12:18 AM2017-04-22T00:18:14+5:302017-04-22T00:18:14+5:30
झोपडपट्टीतील गरीब, दलित, सामान्य कुटुंबांतील आई- बहिणींची सुरक्षितता कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेरावमुळे धोक्यात आली होती.
आरोपींचे बयाण : २० वर्षांपासून दहशतीत होते नागरिक
बडनेरा : झोपडपट्टीतील गरीब, दलित, सामान्य कुटुंबांतील आई- बहिणींची सुरक्षितता कुख्यात गुंड अशोक गजभिये ऊर्फ खांडेरावमुळे धोक्यात आली होती. यामुळेच हताश होऊन एकजुटीने त्याचा खात्मा करावा लागला, असे बयाण खुनाच्या आरोपात अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी पोलिसांना दिले आहे.
बडनेऱ्यातील नवीवस्ती स्थित पंचशीलनगरात ‘खांडेराव’ हा रात्री-अपरात्री महिला, मुलींची छेड काढायचा. भीतीपोटी किंवा बदनामी होईल, या कारणास्तव अनेक मुलींच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या नाहीत. अल्पवयीन मुलींमध्ये त्याची प्रचंड दहशत होती. परिणामी ‘खांडेराव’ याची विकृत प्रवृत्ती संपविणे हाच एक मार्ग होता, असे आरोपींनी बयाणात म्हटले आहे. त्याचा खात्मा केला म्हणून नव्हे तर अशोक याचेवर बडनेरा पोलीस ठाण्यात यापूर्वी बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, हे देखील अटकेतील आरोपी हिरामन रोकडे, संतोष पकिड्डे यांनी बयाणात नमूद केले आहे. २० वर्षांपासून अशोकच्या गुंड प्रवृत्तीने नागरिक त्रस्त झाले होते. अनेकदा पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र अपुऱ्या साक्ष पुराव्या अभावी त्याची न्यायालयातून सुटका झाली. कठोर शिक्षा होत नसल्याने अशोकची विकृत प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच चालेली होती. त्यामुळे तो नागरिकांवर वचक ठेवून होता.
सामूहिक गुन्हा दाखल करावा
बडनेरा : अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसुली, दारू विक्रेत्यांवर रुबाब टाकून फुकटात मद्यप्राशन तसेच महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, अल्पवयीन मुलींवर वाईट नजर ठेवणे हा त्याचा शिरस्ता होता. त्यामुळेच अशोकची हत्या झाल्यानंतर त्याच दिवशी पंचशीनगरातील महिला, पुरुषांनी पोलीस ठाणे गाठून सामूहिकपणे गुन्हे दाखल करा, अशी पोलिसांना मागणी केली होती. अशोक याचेवर आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये चार विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याची पोलीस दत्फरी नोंद आहे. विशेषत: अल्पवयीन मुलींच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच कुख्यात गुंड ‘खांडेराव’ याचा खात्मा करण्यात आला. अशोकच्या हत्येप्रकरणातील आरोपी हिरामन रोकडे याने मुलगी आणि पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच वडिल आणि पतीचे एकाच वेळी कर्तव्य निभावल्याची भावना पोलिसांकडे व्यक्त केली. (शहर प्रतिनिधी)