तर राजकीय नेत्यांच्या सभेचे भोंगेही बंद करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 07:45 AM2022-04-19T07:45:00+5:302022-04-19T07:45:01+5:30
Amravati News कुण्या एका धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करत असाल, तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, जाहीर सभा घेणाऱ्या नेत्यांचे भोंगेही बंद करा, अशी आक्रमक भूमिका राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे.
अमरावती : कुण्या एका धार्मिक स्थळावरील भोंगे बंद करत असाल, तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, जाहीर सभा घेणाऱ्या नेत्यांचे भोंगेही बंद करा, अशी आक्रमक भूमिका राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. भोंग्याच्या मुद्यावरून अचलपूर परतवाडा शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कडू यांनी धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांच्या भूमिकेवर कडाडून हल्ला केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर राज्यात भोंग्याचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यातच आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भोंग्यावर मोठे विधान केले आहे. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिरे, बौद्ध विहार,मशिदीमधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेचा भोंगा सुरू होता. देश सध्या कुठल्या परिस्थितीत जात आहे. ते सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे इतर मुद्दे बाजूला सारून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मुद्यांना हवा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजेत, अशी थेट भूमिका बच्चू कडूंनी घेतली. निवडणुकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.