-तर पेट्रोलपेक्षाही महाग होईल पाणी; 350 फुटांपर्यंतही थांग लागेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 05:00 AM2021-07-14T05:00:00+5:302021-07-14T05:00:43+5:30
हल्ली पावसाळा असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, काही घरांमध्ये जीवन प्राधिकरणच्या परवानगीशिवाय बोअरवेल खोदण्यात आले आहे. विशेषत: नव्या नागरी वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदल्याशिवाय घर अथवा सदनिकांचे बांधकाम सुरू करण्यात येत नाही. बोअरवेल खोदण्याची अधिकृत परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळे मर्जीनुसार जमिनीत पाणी लागेपर्यंत बोअरवेल खोदल्या जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती, बडनेरा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्धारे दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. दुसरीकडे अनधिकृत बोअरवेलची संख्या बेसुमार वाढत आहे. कोण, किती फूट बोअरवेल खोदते, याचे मापदंड नाहीत. येथील साईनगर, कॅम्प भागात ३५० फुटांपर्यंत बोअरवेलला पाणी लागत नसल्याची माहिती आहे. पाणी वापराचे नियोजन नसल्याने भविष्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागेल, यात दुमत नाही.
हल्ली पावसाळा असल्याने पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, काही घरांमध्ये जीवन प्राधिकरणच्या परवानगीशिवाय बोअरवेल खोदण्यात आले आहे. विशेषत: नव्या नागरी वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदल्याशिवाय घर अथवा सदनिकांचे बांधकाम सुरू करण्यात येत नाही. बोअरवेल खोदण्याची अधिकृत परवानगी घेण्यात येत नाही. त्यामुळे मर्जीनुसार जमिनीत पाणी लागेपर्यंत बोअरवेल खोदल्या जाते.
२०० फुटांच्यावर बोअरवेल खोदायचे असेल, तरच घरापर्यंत खोदणारी मशीन येते, असा शिरस्ता झाला आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत बोअरवेलची शोधमाेहीम हाती घेतल्यास अनेक घरे, सदनिका, बंगल्यांमध्ये त्या खोदल्या असल्याचे वास्तव समाेर येईल.
हल्ली राजरोस बोअरवेल खोदल्या जात असून, भविष्यात जमिनीत पाणी मुरण्याकरिता सिमेंट काँक्रीटीकरणामुळे पाण्याची पातळी अधिक खोल जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमरावती महानगराला २४ जलकुंभावरून पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. महापालिकेत नियमबाह्य बोअरवेल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची अद्यापही नोंद नसल्याची माहिती आहे.
जलपुनर्भरण नावालाच
महापालिकेत नव्या बांधकामाला परवानगी देतावेळी मंजूर नकाशात जलपुनर्भरण प्रणाली असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे १० हजार रुपये अनामत रक्कम जमा करण्यात येते. मात्र, हे जलपुनर्भरण नावालाच ठरते. बांधकामानंतर अभियंता घटनास्थळी जाऊन जलपुनर्भरणबाबतची पाहणी करीत नाही.
- किशोर शेळके, अमरावती.
अवेळी पाऊस येणे ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने जलपुनर्भरण व्यवस्था उभारणे ही काळाची गरज झाली आहे. सिमेंटच्या जंगलामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसून, ते वाहून जाते. जमिनीत पाणीसाठा कमी हाेत चालला आहे. याकरिता ठोस उपाययोजना व्हाव्यात.
- रमेश जाधव, अमरावती.
कंवरनगर, दस्तुरनगरात सर्वाधिक बोअरवेल, पाणी सर्वांत कमी
कंवरनगर, दस्तुरनगर भागात मजीप्राच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, अशी रहिवासी नागरिकांची ओरड आहे.
अंबागेट, बुधवारा, साबणपुरा, औरगंपुरा, जवाहरगेटच्या आतील भागात जलवाहिनी ३० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
कंवरनगर, दस्तुरनगर भागात अधिक संख्येने बोअरवेल आहे. त्यामुळे पाणी कमी मिळते. जलकुंभापासून हा भाग लांब असल्याने पाणी मिळत नाही.
कोणीही या, बोअरवेल खोदा
- शहरातील नव्या कॉलनी, वस्त्यांमध्ये बोअरवेल खोदण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. आपल्या मर्जीप्रमाणे बोअरवेल खोदले जाते. साईनगर, कॅम्प भागात ३५० फुटांच्यावर बोअरवेल खोदले जात आहे.
- राज्य शासनाने २५ मे २०१९ रोजी बोअरवेल खोदण्याबाबत नागरिकांकडून मते मागविली होती. मात्र, नियमबाह्य बोअरवेल खोदण्याचा प्रताप सुरूच आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याने पाणी कमी मिळते. नियमबाह्य बोअरवेल खोदून पाणी उपसण्याची शक्कल लढविली जात आहे.
बडनेरा, महादेवखोरी, व्हीएमव्ही भागात जास्त पाणी
- जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभ असलेल्या भागात जास्त पाणी मिळते. यात बडनेरा, महादेवखोरी, व्हीएमव्ही, साईनगर आदी भागात जास्त पाणीपुरवठा होतो.
- शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी वडाळी, नागपुरी, नवसारी, पॅराडाईज कॉलनी, मायानगर भागात पुरेसा पाणीपुरवठा होतो.