सामाजिक न्याय विभागाच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’चे संकेतस्थळ बंद, महिनाभरापासून कामकाज ठप्प
By गणेश वासनिक | Published: February 28, 2023 05:56 PM2023-02-28T17:56:09+5:302023-02-28T17:57:03+5:30
पुणे येथील एजन्सीकडे कंत्राट, ऑफलाइन कामकाजाला ब्रेक
अमरावती : राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीचे संकेतस्थळ गत महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, मराठा, एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी भटकंती करावी लागत आहे. चांद्यापासून तर बांध्यापर्यंत हीच स्थिती असताना राज्य सरकारचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविल्याचे वास्तव आहे.
‘कास्ट व्हॅलिडिटी’संबंधित अर्ज स्वीकारणे, पोचपावती देणे, त्रुटीची पूर्तता करणे, जातवैधता प्रमाणपत्र ऑनलाइन देणे ही कामे पुणे येथील एका एजन्सीकडे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने साेपविली आहे. विद्यार्थी, नागरिक वा राजकीय व्यक्तींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ मिळविणे सुकर व्हावे, यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, राज्यभरात महिनाभरापासून ‘कास्ट व्हॅलिडिटी’चे संकेतस्थळ बंद असताना पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘कास्ट व्हॅलिडिटी’बाबतचा ऑनलाइन कामांचा कंत्राट सोपविताना अटी, शर्थीच्या अधीन राहून करारनामा झाला आहे. तब्बल महिनाभरापासून सदर एजन्सीने पोर्टल बंद ठेवले असेल तर ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. तर दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’ विभागात उमेदवार आणि पालक येरझारा मारून थकून गेले आहेत. ऑनलाइन कामकाज बंद असताना ऑफलाइनची सुविधा नाही, हे विशेष.
- तर फौजदारी दाखल करण्याची तरतूद
‘कास्ट व्हॅलिडिटी’ऑनलाईन कामकाजाविषयीचे संकेतस्थळ पूर्वसूचना न देता बंद केले असेल तर करारनाम्यानुसार संबंधित कंत्राटदार एजन्सीवर फौजदारी दाखल करण्याची तरतूद आहे. राज्यभरात संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले असताना याकडे पुणे येथील प्रमुखांनी का बरं दुर्लक्ष चालविले, हा देखील चिंतेचा विषय आहे. कंत्राटदार एजन्सीने तब्बल महिन्याभरापासून पोर्टल बंद ठेवल्याप्रकरणी फौजदारी दाखल करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
‘बार्टी’ संचालकांचा ‘नो रिपॉन्स’
हल्ली दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. काही दिवसांनंतर विद्यार्थ्यांची ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी गर्दी उसळणार आहे. अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, मराठा, एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांची ‘कास्ट व्हॅलिडिटी’साठी होणारी फरफट थांबावी, यासाठी पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संचालक धम्मज्योती गजभिये यांच्याशी ‘लाेकमत’ने सतत संपर्क साधला असता उपलब्ध होऊ शकले नाहीत.