चिखलदरा पंचायत समितीवर समाजकल्याण सभापतींची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:17+5:302021-07-15T04:11:17+5:30
फोटो कॅप्शन समाज कल्याण सभापती व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागात जाऊन आढावा घेतला तर तेही पत्रकावर दुसऱ्या ...
फोटो कॅप्शन समाज कल्याण सभापती व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागात जाऊन आढावा घेतला तर तेही पत्रकावर दुसऱ्या दिवशी साक्षरी
-----------------------------------------------------------------------------
पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी बेपत्ता, ५०पैकी तीन हजर, दुसऱ्या दिवशीची स्वतः लावली हजेरी
नरेंद्र जावरे - परतवाडा : चिखलदरा तालुक्याचा कारभार हाकणाऱ्या पंचायत समिती कार्यालयात बुधवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांनी भेट दिली असता, ९० टक्क्यांवर अधिकाऱ्यांसह कर्मचारी बेपत्ता आढळून आले. काहींनी हजेरीपटावर १४ जुलैला हजर असल्याची स्वाक्षरी करून पोबारा केल्याचे आढळून आले. या गंभीर प्रकाराची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.
अतिदुर्गम मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या विविध उपाययोजना महत्त्वपूर्ण कामासाठी पंचायत समिती कार्यालयात त्यांना ये जा करावी लागते. परंतु, अधिकारी व कर्मचारी बेपत्ता राहत असल्यामुळे नागरिकांची मानसिक आणि आर्थिक ससेहोलपट होत असल्याची ओरड नेहमीची आहे. अशातच बुधवारी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे, काँग्रेसचे राहुल येवले, सहदेव बेलकर, पीयूष मालवीय, विक्की राठोर, किशोर झाडखांडे, संजू बेलकर, यशवंत काळे, रवींद्र झाडखंडे, अमित बेलकर, मंगल कोगे आदींनी भेट दिली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दस्तुरखुद्द गटविकास अधिकारी प्रकाश पोळ अनुपस्थित आढळून आल्याने संबंधितांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्यावर मग्रारोहयोच्या प्रशिक्षणासाठी ते बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात प्रकाश पोळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बॉक्स
सीईओंकडे करणार तक्रार
चिखलदरा पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराबद्दल जिल्हा परिषदेकडे तक्रार करणार असल्याचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कार्यालयातून अधिकारीच कर्मचारी बेपत्ता आढळून आल्याचा प्रकार संतापजनक आहे. दुसऱ्या दिवशीची हजेरी पटावर लावून पळ काढणारे महाभागसुद्धा आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
बुधवारी दुपारी २ च्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात भेट दिली असता, ५० पैकी केवळ तीन कर्मचारी होते. काहींनी दुसऱ्या दिवशीच्या हजेरीवर स्वाक्षरी केल्याचा गंभीर प्रकार दिसला. यासंदर्भात सीईओंकडे तक्रार करून कारवाईसंदर्भात प्रकरण लावणार आहे.
- दयाराम काळे, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती, अमरावती