सोफियाचा ‘दगाफटका’ सुरूच!

By admin | Published: March 23, 2016 12:24 AM2016-03-23T00:24:53+5:302016-03-23T00:24:53+5:30

महसूल प्रशासनाला अंधारात ठेवत रतन इंडियाने २ लाख ब्रास मुरूम अवैधरीत्या रेल्वे कामाकरिता वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Sofia's 'Dagafata' started! | सोफियाचा ‘दगाफटका’ सुरूच!

सोफियाचा ‘दगाफटका’ सुरूच!

Next

नागरिकांसह प्रशासनाला अव्हेरले : बाधितांची फसवणूक
अमरावती : महसूल प्रशासनाला अंधारात ठेवत रतन इंडियाने २ लाख ब्रास मुरूम अवैधरीत्या रेल्वे कामाकरिता वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे. रतन इंडिया (जुने नाव इंडिया बुल्स)ला अवैध कृत्याबद्दल ४ कोटींचा दंडही महसूल प्रशासनाने ठोठावला. मात्र, एक केंद्रीय मंत्रीच आपल्या हातात असल्याने महसूल प्रशासन वा कुणीही आपले काहीही बिघडवू शकत नाही, असे कंपनीतील वरिष्ठ राजरोसपणे सांगतात. त्यामुळे हा कोट्यवधींचा दंडही ते निमूटपणे भरतील, असे अजिबात नाही.
सन २००९ पासूनच सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या व्यवस्थापन व स्थानिक अधिकाऱ्यांनी अमरावतीकरांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी विविध आमिषेसुद्धा दाखविली. टोकाचा विरोध मोडीत काढून आता तर सोफियातून वीजनिर्मिती सुरू झाल्याने कंपनी ‘मुजोर’ बनली आहे. विरोधाची धार तीव्र असताना मुंबई-दिल्लीच्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता कंपनी मुजोर झाली आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यात कंपनी यशस्वी ठरत आहे. स्थानिकांना सर्वाधिक रोजगार,स्वस्त दरात वीज, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशी विविध आश्वासने सोफियाकडून देण्यात आली. यातील एकाही आश्वासनाची पूर्ती अद्यापही झाली नाही. सिंचनाचे पाणी व १२ लाख लोकांच्या पेयजलावर डल्ला मारत सोफियाची सामाजिक बांधिलकी केवळ आग विझविण्याच्या एखाद्या प्रसंगापुरती मर्यादित आहे. प्रशासनालाही आपण मोजत नसल्याचे कंपनीने गौण खनिजाच्या रॉयल्टीचे ४ कोटी रुपये थकवून दाखवून दिले आहे.

१ लाख ८० हजार शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला!
सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अप्पर वर्धातील पाणी आरक्षित केल्याने सिंचनक्षेत्र बाधित होऊन १ लाख ८० हजार शेतकऱ्यांचा रोजगार बुडणार आहे, अशी भूमिका घेत आॅक्टोबर २०१० मध्ये सोफिया हटाव संघर्ष समिती जन्माला आली होती. तो विरोध मोडून काढून सोफियाचा ‘दगाफटका’ सुरूच आहे.

कोळसा वाहतुकीने रस्त्यांची दुर्दशा
नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतील सोफियासाठी कोळशाची ने-आण सतत सुरू असते. अनियंत्रित वाहतुकीमुळे या भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वलगाव येथील नागरिकांनी सोफियाच्या ट्रक वाहतुकीबाबत आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनालाही सोफियाचे व्यवस्थापन जुमानले नाही.

११७८ शेतकऱ्यांची जमीन
डवरगाव व लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत उभी राहिली. सुमारे १२०० शेतकऱ्यांची ७ हजार एकर जमीन १९९४ मध्ये कवडीमोल भावात घेतली गेली. त्याच जागेवर ही वसाहत उभी राहिली व तेथेच सोफिया औष्णीक विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला. स्थानिकांना नोकरीची संधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. २२ वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने नौकरी द्यावी, यासाठी ५ जून २०१० ला अन्याय निवारण समितीने आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलकांच्या भावनेलाही सोफियाने हरताळ फासला आहे.

Web Title: Sofia's 'Dagafata' started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.