माती होतेय वांझ !
By admin | Published: February 26, 2017 12:04 AM2017-02-26T00:04:08+5:302017-02-26T00:04:08+5:30
पीक उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचा पोत हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो.
नियमित परीक्षण महत्त्वाचे : जमिनीचा पोत सुधारणे आवश्यक
अमरावती : पीक उत्पादनवाढीसाठी शेतजमिनीचा पोत हा नैसर्गिक घटक आहे. यासाठी जमिनीची सुपीकता हा घटक महत्त्वाचा ठरतो. मात्र. अलीकडे उत्पादनवाढीसाठी बेसुमार रासायनिक खतांचा वापर होत आहे. तिहेरी पीक घेण्यासाठी संकल्पना अलीकडेच रूजल्याने जमिनी सतत पाण्याखाली राहते. यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस जमिनीची उत्पादकता कमी होऊन जमीन वांझ होत आहे.
अधिक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांद्वारा बेसुमारपणे रासायनिक खतांचा वापर केला. कीटकनाशकांची फवारणी अधिक होत आहे. मात्र मातीचे परीक्षण करून कमी असलेल्या घटकाचा वापर करीत आधुनिक पद्धतीने शेती करणे आवश्यक आहे.
जमिनीच्या पुनरुज्जीवनासोबत संवर्धनासाठी वास्तविकता जैविक घटकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. मात्र तसे होत नसल्याने उत्पादन वाढीसाठी भविष्यातील शेती मात्र साथ देणार नाही, अशी स्थिती आहे.
खतांचा बेसुमार वापर धोक्याचा
अमरावती : मातीचा पोत सुधारण्यासह आधुनिक पद्धतीत परंपरागत शेती पद्धतीची जोड देणे महत्त्वाचे आहे व हे आव्हान अलीकडेच शेतकऱ्यांना जाणवू लागले आहे. वास्तविकता माती ही एक प्रकारची जैविक संरचना आहे. मातीमध्ये अनेक सूक्ष्म जीव असतात. जे हवेतून नत्र व सूक्ष्म अन्नाचे तत्त्व घेऊन मातीला सुपीक करीत असतात. गांढूळासारखे जीवदेखील मातीची गुणवत्ता वाढवीत असतात. मात्र, रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची जैविक संरचना बिघडली आहे. मातीचे नैसर्गिक गुणधर्म कमी होऊन काही ठिकाणी माती वांझ झाली आहे. काही ठिकाणी सतत रासायनिक खतांचा वापर अधिक होत असला तरी मातीचे गुणधर्म लोप पावल्याने उत्पादनवाढीमध्ये मात्र उत्पादकता स्थिर झालेली नाही. देशी वाणात रोग प्रतिकारक क्षमता असते व रोगास कमी बळी पडतात. मात्र, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे पिकांची रोग प्रतिबंधक क्षमता कमी होत आहे. कीड रोगांची क्षमता वाढली.
येथील मातीचा नमुना घेऊ नये
माती परीक्षणासाठी शेतात झाडाखालील, विहीरीजवळील, निवास स्थानाजवळ, जनावरे बसण्याची जागा, पाणी साचत असलेले भाग या ठिकाणच्या मातीचा नमुना घेऊ नये व मातीचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी रासायनिक खतांच्या रिकाम्या थैलीचा वापर करू नये, पॉलिथीन किंवा कापडी पिशवीत नमुना घेणे महत्वाचा आहे.
नियमित पाणी परीक्षण, समृद्धीचे लक्षण
जमिनीची रासायनिक व भौतिक तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जमिनीचा सामू (पी.एच.), विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रीय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फूरद, पालाश याचे गुणधर्म तपासणीसाठी मातीचे परीक्षण आवश्यक आहे व त्यानुसार सेंद्रीय रासायनिक खतांचा वापर केल्यास पिकांची उत्पादकता वाढते.
नमुना घेण्याच्या पद्धतीवर परीक्षणाचे यश अवलंबून
माती परीक्षणाचे महत्व त्याची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यत: शेतातील मातीचा नमुना घेण्याचे पद्धतीवर अवलंबून आहे. मातीचा नमुना चुकीच्या पद्धतीने घेतल्यास परीक्षणाच्या इतर पैलूचे महत्त्व कमी होते व त्यापासून अपेक्षित फायदा होत नाही. त्यामुळे मातीचा नमुना शास्त्रीय पद्धतीने घेणे महत्त्वाचे आहे.
जैविक श्रुंखला बाधित
रासायनिक खतांच्या अधिक वापरामुळे जमिनीची पाणी धरण करण्याची क्षमता कमी होत आहे. कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे जैविक श्रुंखलाच बाधित झाली आहे. माणसांसह सर्व गुरांमध्ये याचा अंश पोहोचतो. अगदी आईच्या दुधातदेखील कीटकनाशकांचे अंश आढळल्याचे निष्कर्ष जैविक विभागाच्या संशोधनात आढळून आले आहेत.
क्षारतेच्या प्रमाणात वाढ
बागायती शेतीमध्ये सिंचनासाठी सतत पाळीद्वारे पाणी दिले जात असल्याने जमिनीतील क्षार वाढली आहे. पाणी साठणे, दलदल होणे याचा थेट परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होतो. कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर पाण्याद्वारे या विषाचे अंश नदिनाल्यात पाहोचतात. तसेच कीटकनाशकांचा परिणाम हवेमुळे वातावरणातदेखील पोहोचतो.