राज्य महामार्गाच्या बांधकामात माती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:12 AM2021-04-27T04:12:32+5:302021-04-27T04:12:32+5:30
फोटो पी २५ चांदूर बाजार चांदूर बाजार : शहरात सुरू असलेल्या राज्य महामार्गाच्या कामात मुरूम, गिट्टीऐवजी माती टाकण्यात ...
फोटो पी २५ चांदूर बाजार
चांदूर बाजार : शहरात सुरू असलेल्या राज्य महामार्गाच्या कामात मुरूम, गिट्टीऐवजी माती टाकण्यात येत आहे. याबाबत परिसरातील नागरिकांतर्फे तक्रार करण्यात येत असून, याकडे संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे.
अमरावती ते चांदूर बाजार या बोराळा, शिराळा गावातून राज्य महामार्गाचे सुरू आहे. सदर काम पूर्णत्वास येत असताना, शहरातील भक्तिधाम परिसरात अद्याप रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या रस्त्याच्या बांधकामात रस्त्याच्या कडेला खोदून माती काढण्यात आली आहे. यात मुरूम, गिट्टी, बोल्डरऐवजी तेथीलच मातीमिश्रित साहित्य टाकण्यात येत आहे. यामुळे रस्त्याचा दर्जा खालावत असल्याची शंका परिसरातील नागरिकांतर्फे वर्तविली जात आहे.
गैरप्रकार लपविण्यासाठी या मातीमिश्रित साहित्यावर कंत्राटदारातर्फे हातोहात हलक्या दगडांचा खच टाकून सगळे काही व्यवस्थित असल्याचा बनाव केला जात असल्याचा आरोपसुद्धा परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. या मातीमिश्रीत साहित्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होणारा रस्ता हा निकृष्ट दर्जाचा होत आहे. या सर्व गैरप्रकारकडे राज्य महामार्ग बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. संबंधित कंत्राटदाराच्या गलथान कारभाराविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. मातीमिश्रित साहित्य काढून त्या जागी मुरूम अथवा गिट्टी बोल्डरचा भरणा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.