मेळघाटातील ‘चोपण’ या गावाला सौरऊर्जाधारित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:02+5:302021-06-16T04:17:02+5:30
अमरावती : अद्यापही वीज न पोहोचलेल्या मेळघाटातील गावांमध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जाधारित वीज प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाकडून चालना ...
अमरावती : अद्यापही वीज न पोहोचलेल्या मेळघाटातील गावांमध्ये वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जाधारित वीज प्रकल्पाला जिल्हा प्रशासनाकडून चालना देण्यात येत आहे. धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौरऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. याप्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे.
जिल्ह्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतीअंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील १६१ घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे. मेळघाटातील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी वन, ऊर्जा व विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न होतच आहेत. मात्र, शक्य तिथे पारंपरिक वीजपुरवठ्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा सुविधांबाबतच्या योजनाही भरीवपणे राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्याबाबत प्रशासनातर्फे ‘मेडा’च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौरऊर्जाधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यता आला आहे. मेळघाटातील चोपण या दुर्गम गावात प्रकल्प आकारास आला आहे. त्याची तपासणी व आवश्यक बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होत्या.
२४ किलोवॅट क्षमतेचा सूक्ष्म पारेषण प्रकल्प
वीज नसलेल्या गावांसाठी हा सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प राबविला जातो. त्याद्वारे गावाला २४ तास वीजपुरवठा शक्य होतो. चोपण येथील प्रकल्प २४ किलोवॅट क्षमतेचा आहे. त्याची प्रकल्प किंमत ४२.४४ लाख असून, धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ‘मेडा’ला सहकार्य लाभले आहे. सौरऊर्जेवरती संपूर्ण गावामध्ये पथदिवे व घरांमध्ये वीजजोडणी करण्यात आली असून, घरातील दिव्यांबरोबरच टीव्हीसुद्धा सुरू होऊ शकतात. हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे.
‘मेडा’च्या सहकार्याने चिखलदरा तालुक्यातील रेहट्याखेड्या या दुर्गम गावीही २९.४ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प अधिकारी श्रीमती सेठी यांनी दिली.
000